स्पर्धेच्या युगात 21 वे शतक भारताचे – डॉ. विजय भटकर

0
15

नागपूर : 21 वे शतक स्पर्धेचे असून सर्वच बाबतीत जगात जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. असे असले तरीही या शतकात देशाला समृद्ध करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले योगदान देणे आवश्यक असून 21 वे शतक हे भारताचे असल्याचे गौरवोद्गार परम महासंगणकाचे जनक व पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी काढले.

नीरी येथील सभागृहात 13 वा नागभूषण पुरस्कार-2014 स्वीकारतांना ते बोलत होते. एक लक्ष रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नीरीचे संचालक डॉ.सतीश वटे, खासदार अजय संचेती, खासदार विजय दर्डा, नागभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर मुंडले, सचिव गिरीश गांधी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.श.नू. पठाण, डी.आर. मल्ल, बी.के. अग्रवाल आदी उपस्थित होते.

आज देशातील अनेक युवक कॅनडा, सिलीकॉन व्हॅली, अमेरिका, जपान, जर्मनी आदी देशात काम करत देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. या देशांमध्ये फिरताना त्यांचे कौतुक आणि अभिमानही वाटतो. आजपर्यंत श्रीमंतीची व्याख्या वेगळी होती. श्रीमंतीचे स्वरुप हे तेथील पैसा, सोन्याच्या खाणी, क्रुड ऑईल यावरुन ठरत होते. मात्र आता ज्ञान असणारा देश श्रीमंत आहे, असे सांगून डॉ. भटकर यांनी माणसाने व्याधी, आधी आणि उपाधी तसेच अहंकारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

महासत्ता बनण्यासाठी हा सुवर्णकाळ असून प्रत्येक क्षण तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. 2035 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश भारत असेल. आर्थिकदृष्ट्या 2030 मध्ये चीन अमेरिकेला मागे टाकेल. तर 40 व्या दशकात भारत चीनला मागे टाकेल. कृषी, उद्योग आणि युवक हे देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे घटक आहेत. तसेच देशाच्या प्रगतीसाठी नद्या, खेडी यांची परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती हेच प्रगतीचे द्योतक असल्याचे डॉ. भटकर यांनी सांगितले,

डॉ. भटकर यांना नागभूषण पुरस्कार प्रदान केल्याने या पुरस्काराची उंची वाढली असल्याचे श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभेच्छा उपस्थितांना ऐकविण्यात आल्या. यावेळी खासदार श्री. संचेती, डॉ. वटे, श्री. गांधी यांनी मनोगत व्यक्त केले.