महादेवाच्या गजराने दुमदुमले प्रतापगड

0
42

अर्जुनी-मोरगाव : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड या तिर्थस्थळावर महाशिवरात्री पर्वानिमित्त दोन लाखावर भाविकांनी भोलाशंकर व मुस्लिम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारूनी बाबांचे दर्शन घेतले. ‘हर बोला… हर हर महादेव…’ असा गजर करीत भाविकांनी दर्शनासाठी उन्हातान्हात लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

मंगळवारला (१७) प्रतापगडावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोेले, खा.नाना पटोले, आ.राजेंद्र जैन व मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी हजेरी लावून प्रतापगडावर महादेवाचे दर्शन घेतले. याशिवाय महाप्रसाद वितरणातही सहभाग घेतला.

हातात त्रिशूल व मुखात महादेवा जातो गा…. असे भक्तीगीत गात येथे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांचे जत्थे येथे सोमवारच्या रात्रीपासूनच डेरेदाखल झाले. भल्या पहाटेपासून भक्तजणांच्या गर्दीने प्रतापगड फुलले होते. सकाळी ११ वाजतानंतर भाविकांनी प्रचंड गर्दी केली. वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने भाविकांचे आवागमन सायंकाळपर्यंत सुरूच होते.

माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनामुळे यावर्षी खा.प्रफुल्ल पटेल यांनी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला असला तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आ.राजेंद्र जैन व वर्षा पटेल येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले. नाना पटोले व मित्र परिवार तसेच ना.राजकुमार बडोले व मित्र परिवाराच्या वतीने संयुक्तरित्या, याशिवाय स्व.मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने भक्तजणांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते दरवर्षी येथे भाविकांची गर्दी वाढतच असते. लगतच्या अनेक जिल्ह्यातील भाविक येथे महाशिवरात्रीला दर्शनासाठी येतात. त्यामुळे सोयीसुविधा वाढविण्याची गरज आहे.

जनतेच्या मांगल्याचे मागणे- पटेल

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी प्रतापगडला भेट देऊन भगवान शिवाच्या चरणी माथा टेकून आपल्या परिसरातील जनतेच्या मागल्यांचे मागणे घातले. यावेळी त्यांचासमवेत आ. राजेंद्र जैन उपस्थित होते. त्यांनी पायथ्यापासून महादेवाच्या मंदिरापर्यंतचे सात किमी अंतर शिवभक्तांसोबत पायी चालत त्यांनी पूर्ण केले. वाटेत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून आलेल्या भक्तांशी हितगुज करीत वर्षाताई महादेवाच्या चरणी पोहोचल्या. मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने शिवभक्तांसाठी आयोजित महाप्रसाद मंडपात त्यांनी भेट दिली. आपल्या हाताने अनेक भक्तांना प्रसादाचे वितरण केल्यानंतर त्यांनी स्वत: महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी देवेंद्रनाथ चौबे, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, राजू एन.जैन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.