महिला म्हणजे मुलांना जन्म देणारी फॅक्टरी नव्हे – मोहन भागवत

0
32

कानपूर, दि. १८ – हिंदू महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा असे विधान करणा-या हिंदूत्ववादी नेत्यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचले आहेत. ‘आमच्या माता म्हणजे मुलांना जन्म देणारी फॅक्टरी नाही, किती मुलांना जन्म द्यायचा हा त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे’ असे भागवत यांनी म्हटले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी कानपूरमध्ये संघांशी संबंधीत ४० संघटनांच्या ३०० प्रतिनिधींची मेळावा घेतला होता. भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी हिंदू महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानाशी विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी सहमती दर्शवली होती. कानपूरमधील कार्यक्रमात मोहन भागवत यांनी साक्षी महाराज व त्यांच्या विधानाशी सहमती दर्शवणा-यांवर निशाणा साधला. ‘मी कोणालाही बोलण्यापासून रोखू शकत नाही, पण नेत्यांनी नेहमी विचार करुन बोलायला हवे’ असे भागवत यांनी नमुद केले. ‘केंद्रात आपले सरकार आहे हे बोलणे आपण बंद केले पाहिजे’ असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.