अंध भगिनींची डोळस दृष्टी : वृंदा थत्ते

0
60

जागतिक महिला दिन म्हणजे 8 मार्च. महिलांच्या, माता भगिनींच्या हक्काच्या सन्मानार्थ जगात साजरा होणारा हा दिवस. भारतात 8 मार्च 1943 साली मुंबई येथे हा महिला दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. तद्नंतर 1975 हे वर्षही जागतिक महिला वर्ष म्हणून युनोने जाहीर केले. महिलांचा हक्क याबाबतचा हा दिवस. हे या महिला दिनाचे महत्व.

रायगड जिल्ह्यातील श्रीमती वृंदा थत्ते यांनी अंध महिलांना आधार मिळवून देण्यात महत्वपूर्ण कामगिरी केली. याबद्दल त्यांचा नुकताच अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या कार्याने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला हा मानाचा मुजरा…

“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या संतांच्या वचनाप्रमाणे उच्च शिक्षित असुनही केवळ समाजकार्याचे आगळेवेगळे ध्येय्‍य डोळ्यासमोर ठेवून श्रीमती थत्ते यांनी अंध महिलांच्या विकासाचा ध्यास हाती घेतला आणि त्या अंध माता भगिनींच्या जीवनात दिव्यदृष्टी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. प्रयत्नाला यश येतच होते, शासनानेही त्याची दखल घेतली आणि प्रतिष्ठित समजला जाणारा अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन वृंदा थत्तेंना गौरविले. त्यांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद तर आहेच पण इतरांसाठीही ते अनुकरणीय आहे.

अनुकरणीय उपक्रम

श्रीमती थत्ते यांनी आतापर्यंत केलेल्या या क्षेत्रातील कार्याकडे पाहिले असता असे लक्षात येते की, खरोखरच त्या एका महान कामाशी जोडल्या गेलेल्या आहेत. अंध महिला विकास समिती ही विशेषकरुन अलिबाग व मुरूड तालुक्यांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल अंध महिलांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसनाच्या कार्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. सहाय्यक संचालकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध कार्ये हाती घेतली आहेत. इतर स्वयंसेवी संस्था व शासकीय विभागांशी समन्वय साधून अंध महिलांसाठी विविध उपक्रम चालवणे, अंध महिला, त्यांचे नातेवाईक व संलग्न समाज यांचे समुपदेशन, अंध महिलांच्या जागृतीसाठी कार्यशाळा आयोजित करणे, अंध महिलांमधील स्वयंपूर्तता व नेतृत्वगुणांच्या वाढीसाठी व्यवसाय प्रशिक्षण व बचत गट स्थापनेचे प्रशिक्षण व बचत गट त्यांनी सुरू केले. अंध महिलांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करुन त्यांना शासनाचा वैद्यकीय दाखला तसेच जिल्हा परिषदेच्या अपंग विभागाचे ओळखपत्र मिळवून देणे, अंध महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे आदी कामांकडे त्यांचे विशेष लक्ष आहे.

महत्वाचे म्हणजे अंध महिला व त्यांचे मदतनीस यांचे पूर्वाभिमुखता व गतिक्षमता यासाठी प्रशिक्षण तसेच दैनिक व्यवहार प्रशिक्षण. दृष्टीहीन महिलांना आर्थिक स्वयंपूर्णता मिळवून देण्याकरीता त्यांना काथ्या व बांबूच्या वस्तू, खडू, मेणबत्या, सुशोभित पणत्या, कृत्रिम फुले, राख्या, अगरबत्ती, कागदी पाकीटे, पापड इत्यादी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देणे. महिलांनी बनवलेल्या वस्तूंना मुंबई, दिल्ली इ.शहरांमध्ये तसेच स्थानिक बाजारपेठ मिळवून देणे. समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक तसेच सरकारी व खाजगी उद्योगांकडून समितीच्या कार्यासाठी देणग्या मिळविणे. अंध महिलांच्या सामाजिक पुनर्वसनाचा एक भाग म्हणून सहली आयोजित करणे आदीबाबतही श्रीमती थत्ते यांचा पुढाकार असतो.

आत्मिक योगदान

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (1) या अशासकीय सामाजिक संस्थेने सन 2002 मध्ये अलिबाग व मुरूड तालुक्यातील ग्रामीण अंध महिलांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसनासाठी एक विशेष प्रकल्प सुरू केला. या दोन तालुक्यातील ग्रामीण अंध महिलांचा शोध व रीतसर नोंदणी करणे ही या प्रकल्पाची पहिली व महत्वाची पायरी ठरली. पाच फिल्ड वर्कर्स च्या सहाय्याने क्षेत्रिय अधिकारी वृंदा थत्ते यांनी वर्षभरात अशा 110 महिलांची नोंदणी केली. नोंदणी झालेल्या सर्व महिलांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी व गरजेनुसार वैद्यकीय उपचार अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. प्रत्येक अंध महिलेबद्दल संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक महिलेचे सर्वसमावेशक समुपदेशनही केले गेले. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना करता येण्याजोगे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करुन आवश्यक ती मदत देण्यात आली. उदा.भाजी, मासे विक्री, शिवणकाम, काथ्याच्या वस्तु बनवणे, मेणबत्या बनविणे इत्यादी.

अंधांची डोळस दृष्टी

या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा उचित लाभ मिळावा याकरीता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रकल्पाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात आले. तसेच क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून सतत पाठपुरावा करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद दुर्बल घटकांची अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करते, अशा प्रशिक्षणाच्या आयोजनाचे काम केले. या कार्यक्रमातून प्रशिक्षित होऊन कित्येक अंध महिला स्वयंपूर्ण होऊन खडू, पायपुसणी बनवणे इ.व्यवसाय करु लागल्या आहेत. प्रकल्पामधून सक्षम अंध महिलांना व्यवसायासाठी रोख आर्थिक सहाय्य सुध्दा दिले जाते. 60 महिलांनी कृत्रिम फुले व पुष्पगुच्छ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे व त्यातून नियमित रोजगार मिळवित आहेत. शासकीय कार्यक्रमांमध्ये अभ्यागतांच्या स्वागतासाठी हे पुष्पगुच्छ मोठ्या प्रमाणावर दिले जातात. अशा प्रकारे अंध भगिनींना व्यवसायाची डोळस दृष्टी त्यांनी मिळवून दिली. अंध महिलांनी बनविलेल्या सर्व वस्तूंना दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठ मिळवून देणे हा या प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग आहे.

पुरस्कार

या कार्याची पावती म्हणून चेंढरे ग्रामपंचायतीचा उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठीचा चेंढरे सन्मान पुरस्कार 2009 मिळाला. 2010 मध्ये रायगड जिल्ह्याचा सर्वोच्च पुरस्कार रायगड भूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पनवेल येथील दृष्टी फाऊंडेशनचा महाराष्ट्राची सुकन्या पुरस्कार, प्रगती महिला शैक्षणिक सामाजिक विकास संस्था नाशिक यांचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार असे पुरस्कारही या कार्यासाठी त्यांना मिळाले आहेत. परंतु अंध महिलांची आर्थिक व सामाजिक उन्नती हेच सर्वोत्तम समाधान असे मानून हे समाधान अधिकाधिक मिळवण्यासाठी हे कार्य सतत पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.

-डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग