छत्रपती शिवरायांना अभिप्रेत रयतेचे राज्य निर्माण करणार- मुख्यमंत्री

0
21

अलिबाग,दि.4 : छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असा महाराष्ट्र निर्माण करणार असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी रायगड या ऊर्जास्त्रोताच्या ठिकाणी आलो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्यावर केले.

शिवपुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, आमदार सर्वश्री विनायक मेटे, भरतशेठ गोगावले, प्रशांत ठाकूर, धैर्यशील पाटील, मनोहर भोईर, विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, माजी सचिव सुधीर थोरात आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवरायांचे उत्तुंग व्यक्तीमत्त्व होते. त्यांची महती संपूर्ण जगाला कळावी, त्यांची महानता जगासमोर यावी याकरिता सर्वात उंच असे स्मारक अरबी समुद्रात उभे करण्यात येईल. त्यायोगे मराठी मुलखाची ताकद सर्व जगाला दाखवून आम्ही आमची अस्मिता जिवंत ठेवू. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ लढवय्येच नव्हते, तर त्यांची ख्याती कुशल प्रशासक म्हणून देखील आहे. त्यांच्या राज्यात असलेला सर्वधर्म समभावही महत्त्वपूर्ण आहे. अद्भुत व्यक्तीमत्व, शौर्य, सद्गुण असलेला हा देवासारखा राजा होता. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुनच आपले राज्य चालेल.

आपले गड किल्ले केवळ या वास्तु नसून त्या ठिकाणी मराठी अस्मिता आहे. हे गड किल्ले आम्हाला प्रेरणादायी आहेत. त्याद्वारे स्फुर्ती मिळते, ऊर्जा मिळते म्हणून गड किल्ल्यांचे संवर्धन आम्ही करणार आहोत. इतिहासाचे जतन झालेच पाहिजे. हा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे, याकरिता शिवसृष्टी सारखी कल्पना देखील महत्त्वाची आहे. अशा कामांना निधीची कमतरता पडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आपण ज्या-ज्या वेळी रायगड किल्ल्यावर आलो त्या-त्या वेळी नवी स्फुर्ती मिळाली. महाराजांच्या समाधीचे दर्शन, त्यांचा आशिर्वाद आणि ऊर्जा मिळाल्याने मी स्वत:ला धन्य समजतो असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण मराठी माणसांचे आदरस्थान आहे. त्यांचे निवास असलेल्या गड किल्ल्यांची देखभाल व्हायलाच हवी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड किल्ल्याच्या रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृहे, पायऱ्यांची दुरुस्ती, त्या मार्गावर विश्रांती थांबे तसेच रोपवे चे उन्नतीकरण आदी महत्त्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

राज्यात खऱ्या अर्थाने शिवशाही आली असून आता महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होईल, असे उद्गार आमदार विनायक मेटे यांनी काढले. तर गड किल्ले संवर्धनासाठी या शासनाने जो निधी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल शासनाचे व मुख्यमंत्र्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो असे उद्गार आमदार भरतशेठ गोगावले यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश कदम यांनी तर आभार प्रदर्शन महादेव जाधव यांनी केले.

स्मरणिका प्रकाशन

याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते शिवराय मुद्रा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले व रायगड स्मारक मंडळाच्या वतीने गडारोहण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे वंशज उदयसिंह जाधवराव व निवृत्त एअर मार्शल भुषण गोखले यांचा सत्कार करण्यात आला. दुर्गप्रेमी तुकाराम जाधव यांना शिवपुण्यस्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.