आबांच्या निधनानंतर 15 दिवसात पेपर देऊनही मुलाने मिळवले 95 टक्के गुण

0
13

पुणे दि.२९ ::- महाराष्ट्राचे लाडके नेते, माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी या जगातून आकस्मिक एक्झिट घेतली. आबांच्या अकाली जाण्याने आजही महाराष्ट्र हळहळ व्यक्त करीत आहे. आबांच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली याचा नुसता विचारच केलेला बरा.
पण याला अपवाद ठरला आहे आर आर आबांचा 16 वर्षीय मुलगा रोहित आणि पुतण्या रोहन. कारण आबांचा चिरंजीव रोहीत आणि आबांचा सख्खा पुतण्या रोहन सुरेश पाटील या दोघांनी आबांच्या निधनानंतर पंधराव्या दिवशीच दहावीच्या CBSE बोर्डाचा पहिला पेपर दिला होता. महाराष्ट्राने एक हळव्या मनाचा नेता गमावला होता. रोहितने आपल्या पापाला तर रोहनने कर्तबगार चुलत्याला गमावले होते. अशा अत्यंत प्रतिकुल व दु:खद परिस्थितीत आणि शोकमग्न मानसिकतेत या दोन लहान भावडांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा गुरूवारी निकाल लागला. यात आबांचा मुलगा रोहित याने 94.30 टक्के गुण मिळवले आहेत तर पुतण्या रोहन यानेही 92.20 टक्के गुण मिळवले आहेत.
आर आर आबांचे कॅन्सरच्या आजाराने 16 फेब्रुवारी रोजी मुंबईत निधन झाले होते. त्यानंतर मार्चच्या पहिल्याच आठवड्यात दहावीची सीबीएसईची परीक्षा सुरु झाली होती. आबांचा मुलगा रोहित व त्यांचे धाकटे बंधू सुरेश पाटील यांचा मुलगा रोहन हे एकत्रच दहावीला होते. हे दोघेही सांगलीजवळील एक गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होते. परीक्षा जवळ आली असतानाच आबांचे आकस्मिक निधन झाले. सारा महाराष्ट्र आबांच्या अकाली निधनाने हळहळला. कुटुंबांवर तर डोंगरच कोसळला होता. मात्र, 16 वर्षाच्या रोहितने आपल्या पित्याच्या सर्व विधी पार पाडून परीक्षेकडे लक्ष दिले.
आबांच्या निधनाच्या 15 दिवसांनी रोहित व रोहनचा पहिला पेपर होता. मात्र, परीक्षेच्या 5 दिवस आधीच त्यांना घरून शाळेत घालवले. आबा पुरोगामी व बुद्धीनिष्ठ विचाराचे होते. आपला दहावा, तेरावा घालू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार कुटुंबियांनी तीन दिवसातच सर्व विधी उरकले होते. त्यामुळे रोहित व रोहनला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आले. त्यामुळे उर्वरित काळात आपल्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला असतानाही या दोघांनी धीरोदत्तपणा दाखवत परीक्षा दिली होती. अखेर गुरुवारी निकाल लागला व दोघांनीही 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवल्याचे समोर आले.