फडणवीस सरकारविरोधात आक्रमक व्हा- पवारांच्या सूचना

0
9
वृत्तसंस्था
मुंबई –दि. १६: :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षाच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत पक्षसंघटना बळकट करण्याबरोबर राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदाधिकारी, स्थानिक स्वराज संस्थांमधील राष्ट्रवादीचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्यामुळे राज्य सरकारने ठोस उपाययोजना राबविण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. पवारांच्या मागण्या वजा निवेदनाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार विविध उपाययोजना करीत असल्याचे म्हटले होते. मात्र, विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी केली नसल्याचे लक्षात आले. अनेक उपाययोजनांचा फायदा गरजू व दुष्काळी लोकांपर्यंत पोहोचल्या नसल्याचे पुढे आले आहे. या सर्व बाबींचा आढावा पवारांनी आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिका-यांकडून घेतला. तसेच फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याच्या सूचना नेत्यांसह स्थानिक पदाधिका-यांना दिल्या.
यासोबत आगामी एक-दोन महिन्याच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणूका स्वतंत्र लढवाव्यात की काँग्रेस सोबत लढवाव्यात यावर चर्चा झाली. यात काँग्रेससोबत जाण्याच्या विचारावरही बहुतेक नेत्यांत एकमत झाल्याचे दिसून आले.7 डिसेंबर पासून चालू होणा-या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीची भूमिका काय असावी यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्यसभेचे खासदार डी. पी. त्रिपाठी, वंदना चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळाचे गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ आणि गणेश नाईक उपस्थित होते.