लोकसभेत सलीम, राजनाथ यांच्यात खजाजंगी

0
5

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोमवारी लोकसभेमध्ये असहिष्णूतेच्या मुद्यावर अपेक्षेप्रमाणे चर्चेला वादळी सुरुवात झाली आहे. 

 

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोमवारी लोकसभेमध्ये असहिष्णूतेच्या मुद्यावर अपेक्षित चर्चेची वादळी सुरवात झाली आहे. सीपीआय(एम)चे खासदार मोहम्मद सलीम यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

देशात ८०० वर्षानंतर नरेंद्र मोदींच्या रुपाने हिंदूंचे सरकार आले आहे, असे विधान राजनाथ सिंह यांनी केले असा आरोप सलीम यांनी केला. सलीम यांच्या या विधानावर राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

माझ्या संसदीय कारकीर्दीत प्रथमच मी या आरोपामुळे दुःखी झालो आहे.  असे विधान केल्यानंतर कुठलाही गृहमंत्री त्या पदावर राहू शकत नाही. मी बोलताना अतिशय जबाबदारीने बोलतो. त्यामुळे सलीम यांनी जो आरोप केला आहे तो सिध्द करुन दाखवावा अन्यथा त्यांनी माफी मागावी असेही राजनाथ म्हणाले.

राजनाथ सिंह यांचे नियतकालिकामध्ये प्रसिध्द झालेले विधान मी येथे केले. हे जर खोटे असेल तर, राजनाथ यांनी त्या प्रसारमाध्यमाला कायदेशीर नोटीस पाठवावी असा प्रत्युत्तर सलीम यांनी दिले. दोन्ही बाजूंकडून गदारोळ वाढल्यानंतर लोकसभाअध्यक्षांनी काहीवेळासाठी कामकाज तहकूब केले.