माझ्या मुलाचा काही संबंध नाही – चिदंबरम

0
8
चेन्नई – सक्तवसुली संचलनालय (इडी) व प्राप्तिकर विभागाने आज (ता.1) कर्ती चिदंबरम या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या मुलाशी संबंधित असल्याचे मानले जाणाऱ्या कंपन्यांवर टाकलेल्या धाडीसंदर्भात चिदंबरम यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. इडी हे सरकारच्या इशाऱ्यांवर काम करत असल्याचा दावा करत चिंदमरम यांनी यावेळी सरकारने मला थेट लक्ष्य करावे, असे आव्हान दिले. याचबरोबर, सरकारने राजकारणाशी कुठलाही संबंध येऊ न देता स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्या माझ्या मुलाच्या मित्रांना त्रास देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. 

माजी अर्थमंत्री व कॉंग्रेसचे प्रभावशाली नेते पी चिदंबरम यांचा मुलगा असलेल्या कर्ती चिदंबरम याच्या कंपन्यांवर सक्तवसुली संचलनालय (इडी) व प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त आज सूत्रांनी दिले. याआधी, आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत इडी चौकशी करत असलेल्या “एअरसेल-मॅक्‍सिस‘ प्रकरणासंदर्भात कर्ती यांच्याशी निगडित असल्याचे मानल्या जात असलेल्या ऍडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग या कंपनीच्या दोन संचालकांना गेल्या ऑगस्ट महिन्यात इडीतर्फे समन्स बजाविण्यात आले होते.

सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री व तत्कालीन राज्यसभा विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनी मे 2012 मध्ये राज्यसभेमध्ये बोलताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या कुटूंबीयांपैकी एकाच्या मालकीच्या असलेल्या ऍडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीकडून एअरसेल कंपनीस पैसे देण्यात आल्याचा आरोप केला होता. मॅक्‍सिस या मलेशियामधील मोठ्या कंपनीकडून एअरसेल कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आल्याच्या काही दिवस आधीच हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 2006 मध्ये चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री असताना एअरसेलमधील मॅक्‍सिस कंपनीच्या या गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली होती.

धाड टाकण्यात आलेल्या कुठल्याही कंपनीमध्ये माझ्या कुटूंबीयांपैकी कोणत्याही सदस्याचे समभाग नसल्याचे आपण अनेकदा सांगितल्याचेही चिदंबरम यांनी यावेळी स्पष्ट केले.