कारंजातील ‘फार्म’ विविध पिकांनी बहरतेय

0
10

गोंदिया : कित्येक वर्षांपासून धान आणि केवळ धान हे एकमेव पारंपरिक पिक घेत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्यापुढे विविध पिकांचा पर्याय कृषी विभागाकडून ठेवला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात कोणकोणते पिक यशस्वीपणे घेतले जाऊ शकतात याचे प्रयोग कारंजा येथील कृषी विभागाच्या ३३ एकराच्या शेतावर सुरू आहेत. अत्याधुनिक शेती कशी करायची, याचे उत्तम उदाहरण ठरणारे हे प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत असून कृषी विभागाचे हे शेत ‘कृषी पर्यटना’चे केंद्र ठरत आहे.

गोंदिया शहरालगत कारंजा ग्रामपंचायत हद्दीत येत असलेली ३३ एकर जागा कृषी विभागाच्या ताब्यात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी हे शेत म्हणजे केवळ पिकांचे प्रयोग करण्याचे ठिकाण न ठेवता शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे ठिकाण व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यांना योग्य ती साथ देऊन त्यावर मेहनत घेण्याचे काम उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांन केले. त्यातूनच आज या शेतात डाळींबाची बाग फुलली आहे. ऊसाचे पिक बहरले आहे. सीताफळ आणि मोठ्या बोरांची बाग वाढत आहे. पपईची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत सुरू आहे. केवळ हेच नाही तर मत्स्त्यपालनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र तळे बनविण्यात आले आहे. हौसी पर्यटकांना या तळ्यात आकड्याने मासोळ्या पकडण्याची संधी भविष्यात मिळू शकते.

या शेतावर डाळींबाची ५०० झाडं लावणात आली. अवघ्या वर्षभरात ही झाडं चांगली वाढून त्याला डाळींब लागण्यास सुरूवात झाली आहे. वर्षभरापूर्वी लावलेली आंब्याची ९०० झाडे चांगली बहरली आहेत. सीताफळाची ४०० झाडे, बोराची ७५ झाडे, तसेच २.१५ एकरात ऊस लागवड केली आहे. मिरची, ज्वारीचा हुरडा, एवढेच नाही तर छोट्या तलावात शिंगाड्याचेही उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.