भाजप शासित राज्यात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका- शरद पवार

0
11
मुंबई,दि.03(विशेष प्रतिनिधी)- संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आणि भविष्याच्या वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतक-यांच्या कर्जमाफीवरूनही त्यांनी फडणवीस सरकारला फटकारले.भाजप शासित राज्यात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होतील असे भाकीत व्यक्त करत पवारांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले.
खा.पवार म्हणाले, सरकारने सरसकट कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली. मग आता कसले अर्ज भरून घेता. दुसरीकडे, महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे येत्या 5 नोव्हेंबर रोजी शेती संबंधित सर्व संस्था-संघटनाचे महाअधिवेशन घेणार आहोत. त्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. हे आंदोलन जिल्हा-तालुका पातळीवर केले जाईल. रोजगारीचा प्रश्न गंभीर आहे, उद्योगधंदे बंद होत चालले आहेत. त्यामुळे आगामी काळ कठिण असेल. महागाईच्या मुद्यांवर आम्ही स्वस्त बसणार नाही संघर्ष करत राहू, असे पवार यांनी सांगितले.
 बुलेट ट्रेन व्यावहारिक पातळीवर कशी तोट्याची आहे असे सांगत पवार म्हणाले, बुलेट ट्रेनचा गाजावाजा केला जात आहे. मात्र, आर्थिक पातळीवर हा प्रकल्प परवडणारा नाही. जपानची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. तेथील मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा भारतात घाट घातला जात आहे. सरकार व प्रशासनाने मुंबई लोकल व देशातील रेल्वेच्या पायाभूत सुविधाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, याबाबत सरकारसोबतच प्रशासनही उदासीन आहे, असे पवार म्हणाले.  सध्या भाजपविरोधात जनमत तयार होत आहे. सोशल मिडियातून त्यांनी जे पेरले ते उगवत आहे. त्यामुळे भाजप सोशल मिडियात आक्रस्ताळेपणा करत आहे. मात्र, त्याला जोरदार प्रत्त्युत्तर दिले जाईल असे पवारांनी सांगितले.