शाम जाजू, विनय सहस्त्रबुद्धे, शायना एनसींची नावे चर्चेत!

0
27

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार मुरली देवरा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी दुपारी 3 पर्यंत मुदत आहे. त्यासाठी भाजपकडून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम जाजू आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांची नावे चर्चेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या तिघांपैकी एकाचे नाव निश्चित करण्यासाठी पक्षश्रेष्ठींची आज दिल्लीत भेट घेणार आहेत. या तिघांपैकी विनय सहस्त्रबुद्धे यांना संधी मिळेल असे बोलले जात आहे. मात्र, विधान परिषदेत जसे धक्कातंत्र वापरत नवे नाव पुढे आणले गेले तसेच आताही होईल असे सांगत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी भाजप नेत्यांना गॅसवर ठेवले आहे.मुंबईतील काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी पेट्रोलियम मंत्री व खासदार मुरली देवरा यांचे नोव्हेंबर 2014 मध्ये आजाराने निधन झाले होते. फेब्रुवारी 2014 मध्येच देवरांना काँग्रेसने राज्यसभेत पाठवले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. आता निवडून जाणारा सदस्य फेब्रुवारी 2020 पर्यंत राज्यसभेचा सदस्य असेल.

राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करतात. सध्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे सर्वाधिक 123 आमदार आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार विजयी होईल अशी स्थिती आहे. भाजपखालोखाल शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत.