सर्वस्पर्शी-सर्वव्यापी हाच भाजपाचा संकल्प -शिवराजसिंह चव्हाण

0
47

गोंदिया,दि.११जुलैः-देशाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनच उभारले आहे. भारतीय जनता पक्ष संघटनेच्या माध्यमातून राष्ट्र निर्मितीसाठी कार्य करीत आहे. आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असून ११ कोटी सदस्य व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे पक्षाला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोकसभेत ३०३ जागा पदरी पडल्या आहेत. सध्या पक्षाचे सदस्यता अभियान सुरु झाले असून या अभियानाला ‘सर्वस्पर्शी-सर्वव्यापी ‘ करण्यासाठी प्रत्येकाने संकल्प घ्यावा, असे आवाहन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा सदस्य अभियानाचे राष्ट्रीय संयोजक शिवराजसिंह चव्हाण यांनी केले.
ते पोवार बोर्डींग येथे गुरुवार, ११ जुलै रोजी आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. यावेळी आ. अनिल सोले, आ.संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्ष रमेश कुथे, माजी खा. खुशाल बोपचे, माजी आ. भेरसिंग नागपुरे, खोमेश रहांगडाले, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिप उपाध्यक्ष अलताफ हमीद, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, रचना गहाणे, जिप सभापती शैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, युवा मोर्चा अध्यक्ष पंकज रहांगडाले, महिला मोर्चा अध्यक्ष भावना कदम, अमित बुध्दे, किशोर हालानी, रतन वासनिक, नंदकुमार बिसेन व सर्व आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या पापामुळेच देशाची दुर्गती झाली. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याऐवजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मिरचा मुद्या हाताळला असता तर संपूर्ण काश्मिर आपला राहिला असता. चिनने आपल्या जमिनीवर केलेल्या कब्ज्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. देशावर आणिबाणी लादून देशाची वाताहत केली. शहाबानो प्रकरणाच्या न्यायाच्या वेळी राजीव गांधी यांनी संबंधितांना पाठीशी घातले. आई व मुलाने भ्रष्ट सरकार देऊन देशाला आर्थिक डबघाईच्या गर्तेत नेल्याची टिका करीत चव्हाण पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षापूर्वी दिलेला ‘सबका साथ, सबकाङ्क विकास या संकल्प सार्थ ठरल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजपा पूर्ण बहुमताने निवडून आली. देशातील संपूर्ण राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे. पक्षाचे सदस्य अभियान सुरु असून पक्ष विस्तारासाठी फार चांगली वेळ आहे. प्रत्येक बुथवर २०० सदस्य करण्याचा संकल्प करुन विस्तारक म्हणून आपण कार्य करावे. सर्वस्पर्शी म्हणजे, सर्व वर्गाला घेऊन सर्वव्यापी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भाजपचा सदस्य बनवून देश विकासाला हातभार लावण्यासाठी महत्वाचे योगदान द्यावा. मी येथील जावई असल्याने हा जिल्हा सदस्यता अभियानात प्रथम क्रमांकाचा राहावा, ही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.या सदस्यता अभियानासोबत प्रत्येक सदस्याला ५ झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घ्यायचा आहे.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष पटले यांनी जिल्ह्यात मागील सदस्यता अभियानात १ लाख ९ हजार सदस्य केले होते. आता प्रत्येक विधानसभेत २० हजार सदस्य संख्या वाढविण्याचा संकल्प घेऊन २ लाख सदस्य संख्या गाठणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपनाने करण्यात आली. संचालन जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.