राज्यात हवा पूर्णवेळ गृहमंत्री-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण

0
15

अमरावती, ता.२२-राज्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. गुंड निरंकुश झाले आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. हे पाहता राज्याला पार्टटाइम नव्हे तर पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज आहे. राज्य शासनाने पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

अमरावतीत जिल्हा आणि शहर काँग्रेस कमेटीच्या मेळाव्यानिमित्त चव्हाण अमरावतीत आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही सूचना केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकरराव गणगणे, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आ. प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत आणि नागपुरातीलच कारागृहातून पाच कैदी पळून जातात. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी असा टोला त्यांनी लगावला. गेली १५ वर्षे आम्ही सतत सत्तेत होतो. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून रुजायला थोडा वेळ लागेल, अशी कोटी करत काही ठिकाणी काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका बसला अशी कबुली चव्हाण यांनी दिली. स्वतंत्र विदर्भाबद्दल बोलताना खासदार चव्हाण यांनी आपण संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते असल्याचे नमूद केले.