जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये पडली फूट

0
13

स्थानिक आमदाराच्या दबावापुढे कॉंग्रेशश्रेष्ठी गुडघे टेकणार?
निवडणकीसाठी आलेला पक्षनिधी वाटपातही केला घोळ
प्रदेशाध्यक्षाने मागविला पर्यवेक्षकाकडून अहवाल
तटस्थ राहणाऱ्या सदस्यांची भूमिका संशयास्पद

गोंदिया दि.१६- नुकत्याच पार पडलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या मित्र पक्षात उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जि.प.पं.स निवडणुक पर्यवेक्षकाकडून अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त होताच पक्षविरोधी सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, जिल्ह्यातील एका वजनदार आमदार महोदयांनी कॉंग्रेस पक्षाला खासगी मालमत्ता केल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्ते करीत असल्याची चर्चा आहे. आपल्या स्वार्थासाठी एकट्या गोंदिया तालुक्याच्या बळावर जिल्हा कॉंग्रेसची वाताहत करण्याची पूर्ण तयारी या आमदार महोदयांनी केल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसच्या बळकटीकरणासाठी कोणतेही काम न करता पक्षश्रेष्ठीवर दबाब आणून प्रत्येकवेळी पक्षाला तोंडघसी पाडण्याचे प्रकार होत असून पक्षाच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याच्या ही चर्चा जोरात सुरू आहेत.आज मुंबई येथे विधानभवनात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आंदोलन सुरु असतानाच दोन्ही काँग्रेसमध्ये फुट पडली.सभागृहात काँग्रेसने भाजपसरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत सभात्याग केला.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात उपस्थित राहूनच कामकाजात सहभाग घेतल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये गोंदिया जि.प.निवडणुकीवरुन चांगलेच फाटल्याचे दिसून आले.या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्यात बैठक होऊन यावर चांगलीच चर्चा झाली.

गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. तत्पूर्वी, लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना भ्रस्टाचाराचे आरोप करत आणि मतदारांना अशक्यप्राय स्वप्नांचे गाजर दाखवत भाजपने मोठ्या फरकाने सत्ता काबीज केली. मात्र, अल्पावधीतच मतदारांचा मोहभंग झाल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात जनतेने चांगलाच धडा शिकविला. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि क़ॉंग्रेसने वेगवेगळी चूल मांडल्याने आणि काही प्रमाणात बंडखोरांनी डोके वर काढल्याने कॉंग्रेसविचार सरणीच्या मतात विभागणी झाली. परिणामी, भाजपला या निवडणुकीत जि.प.च्या 17 जागा व पं.स. निवडणुकीत आपली अब्रू वाचविण्यास मदत झाली. राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्याने तो सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतापासून मतांच्या विभाजनामुऴे सत्तेपासून दूरच राहिला. कॉंग्रेसपक्षाला केवळ 16 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाला राष्ट्रवादीने प्रचारात उचललेल्या मुद्द्यांचाही फायदा झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या वाढीसाठी जिल्ह्यात जोरदार प्रयत्न केले. याउलट कॉंग्रेसपक्ष हा स्थानिक आमदाराच्या वेशीवर गहाण ठेवल्याने या पक्षाची जिल्ह्यात चांगलीच पिछेहाट झाली.

केंद्रात व राज्यात हे दोन्ही पक्ष भाजप विरोधी तत्त्वांवर हातात हात घालून काम करीत आहेत. त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होत असल्याचे चित्र आहे. मात्र, असे असताना गोंदिया जिल्ह्यातील त्या स्वतःला पक्षाचा तारणहार समजणाऱ्या आमदाराच्या हटधर्मामुळे पक्षाची चांगलीच वाताहत होताना दिसत आहे. स्वतःच्या स्वार्थकारणाशिवाय पक्षाच्या वाढीसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात या आमदार महोदयांनी एकही प्रयत्न केले नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे कार्यकर्ते आजही खुलेआम करीत आहेत. याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे आपल्या पक्षाची पिछेहाट होत असल्यची बतावणी करून पक्षश्रेष्ठी व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार जिल्हा कॉग्रेसमध्ये सुरू आहे.जिल्ह्यातील एका काँगेसच्या नेत्याने विधानसभा निवडणुकापुर्वी भाजपचे नेते नितिन गडकरी यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाची चर्चा केल्याचेही बोलले जात होते.आता या युतीनंतर मात्र अधिकच शंका बळावली गेली आहे.

जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर ठेवून भाजपला सत्तेत आणण्यात या आमदार महोदयांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या 6 तारखेला झालेल्या जिप अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी आलेला पक्षाचा आदेश ठोकरून काढल नवनिर्वाचित सदस्यांना दबाबतंत्राचा वापर करून भाजपला मतदान करण्याची खेळी केली गेली. दरम्यान, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत जाणीवपूर्वक तीन सदस्यांना तटस्थ राहण्याचा सल्ला देऊन प्रदेश कॉंग्रेसशी दोन हात करण्याची तयारी सुद्धा पूर्वी पासून झाल्याची चर्चा कॉग्रेस वर्तुळात आहे. एकीकडे राष्ट्रीय पातळीवर व राज्यात भाजपवर नाना आरोप करायचे आणि जिल्ह्यात त्याच भाजपच्या मदतीने सत्ता भोगायची या त्या आमदारांच्या खेळीमुऴे कॉंग्रेस श्रेष्ठींची पुरती गोची झाली आहे. दरम्यान, सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, या निवडणुकीसाठी आलेल्या पक्षनिधीचे वाटप जिल्ह्यात न करता तो एकटा गोंदिया विधानसभा मतदार संघात खर्च केल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यात या आमदार महोदयाविरोधात तीव्र असंतोष असून घोटाळे लपविण्यासाठी कॉंग्रेसपक्षाला विकायला काढले असल्याचा आरोप थेट कार्यकर्तेच करताना दिसत आहेत. या प्रकरणाला कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी कसे हाताळतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेसजिल्हाध्यक्षही ठरले त्या आमदाराचे मुनीमजी

गोंदिया जिल्ह्यातील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद हे एका निष्क्रीय व्यक्तीच्या हातात असल्याने त्या आमदाराची चलती आहे. जिल्हा पातऴीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविणे वा त्यांना मार्गदर्शन करण्याचे कोणतेही काम सदर जिल्हाध्यक्ष करताना दिसत नाही. यामुळे असा बेगडी जिल्हाध्यक्ष काय कामाचा, असा सवाल ग्रामीण भागातील कार्यकर्ते आता करून लागले आहेत. आम्हाला कोणाचा मुनीम नको, तर पक्षाला योग्य दिशा देणारा जिल्हाध्यक्ष पक्षाने द्यावा,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत भाजपला मदत करा, असा सल्ला देणारा तो कोण?

दरम्यान, भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर करून भाजपला मदत करण्याचा सल्ला गोंदियातील एका बड्या नेत्याने तेथील प्रभारी जिल्हाध्यक्षाला दिल्याची माहिती आहे. यावरून राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपण काय करू शकतो, अशी अप्रत्यक्ष धमकी देणारा तो कॉंग्रेसचा पदाधिकारी कोण, याचा शोध सुद्धा श्रेष्ठी घेतील काय, याकडे भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.