अनु.जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांशी बेरार टाईम्स संपादकांची चर्चा

0
16

गोंदिया,दि.१८ : महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती आज १८ जानेवारीला गोंदिया जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांसह शासकीय कार्यालयातील आदिवासींच्या नोकरीतील स्थिती व इतर विषयाचा आढावा घेण्यासाठी पोचली आहे.या समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यांच्यासह समितीचे आमदार गोंदियातील शासकीय विश्रामगृह,होटल गेटवेमध्ये पोचले.समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.उईके यांची गोंदियाच्या शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे यांनी आदिवासींच्या समस्यावर बेरार टाईम्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या बातम्यांची माहिती दिली.सोबतच बेरार टाईम्सचे अंक दिले.

यावेळी आमदार संजय पुराम,गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती छायाताई दसरे आदी मान्यवर उपस्थित होते.चर्चेवेळी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील अव्यवस्था,मुरकूटडोह दंडारी या गावाला जाण्यासाठी अद्याप व्यवस्थित नसलेला रस्ता,सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ अंतर्गत आदिवासी भागात करण्यात आलेल्या निकृष्ट कामासह गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अद्यापही नोकरभरतीचा रोस्टर तयार करण्यात विभागाने केलेल्या दिरगांईची सविस्तर माहिती दिली.गेल्या सहा सात वर्षापुर्वी गोंदियात जेव्हा आदिवासी कल्याण समिती आली होती तेव्हा समितीने शिक्षण विभागाला रोस्टर अद्यावत करण्याच्या सुचना दिल्या होत्या तेव्हापासून विभाग ही समस्या आजही सोडवू शकला नसल्याचीही माहिती दिली.समितीचे अध्यक्ष आमदार उईके यांनी बेरार टाईम्सचे अंकातील बातम्या बघितल्यानंतर उद्या १९ जानेवारीला शासकीय आश्रमशाळांसह खासगी आश्रमशाळांचा तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगत या तपासणी दरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही येता येईल असे सांगितले.आमदार पुराम यांनी मुरकुटडोह दंडारी हे गाव आदिवासी व नक्षलग्रस्त गाव असल्याची माहिती यावेळी समिती अध्यक्षांना दिली.