राष्ट्रवादीने फाडले ‘नाथूराम’चे पोस्टर

0
15

नागपूर दि. ८: ‘मी नाथूराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाच्या प्रयोगाला विरोध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी वसंतराव देशपांडे सभागृहासमोर तीव्र निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी तेथे लावलेले नाटकाचे पोस्टरही फाडले. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर नाटकाचा प्रयोग ठरल्याप्रमाणे सुरळीत झाला.

शुक्रवारी देशपांडे सभागृहात ‘मी नाथूराम…’नाटकाचा पहिला प्रयोग होता. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेबाबत असल्याने हे नाटक आधीच वादाच्या भोवऱ्यात आहे. यामुळे प्रयोगाला विरोध होईल, अशी शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी या नाटकाचा प्रयोग होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येथे पोहचून विरोध प्रदर्शन सुरू केले. त्यांनी ‘महात्मा गांधी जिंदाबाद व नाथूराम गोडसे मुर्दाबाद’ अशी नारेबाजी करीत नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी नाटकाच्या पोस्टरकडे धाव घेत दोन्ही पोस्टर फाडले. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र आधीच तैनात असलेल्या पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात अनिल अहिरकर, ईश्वर बाळबुंधे, नुतन रेवतकर, दिनकर वानखेडे, विशाल खांडेकर, आशिष नाईक, विनोद हेडाऊ, शैलेश पांडे, गणेश हूड, वसीम पटेल, राहुल पांडे, जगदीश पंचबुधे, रोशन भिमटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.हा सर्व प्रकार आटोक्यात आल्यानंतर कडक पोलीस संरक्षणात नाटकाचा प्रयोग सुखरूप पार पडला.