जिल्ह्यात महिलेसह दोन ठार : कुणबीटोल्यात घर जळाले

0
7

अर्जुनी-मोरगाव/सालेकसा दि. १३: : अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वीजेने दोघांचा बळी घेतला. याशिवाय एक घर भस्मसात केले असून एका महिलेला पक्षघाताचा झटका बसला.
मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने खामखुरा येथील प्रभुदास मारोती मेश्राम (५0) हे आपल्या घरासमागील शौचालयात गेले असता तिथेच वीज पडल्याने त्यांच्या डोक्याला व छातीला शॉक लागून ते गंभीरपणे भाजल्या गेले. शौचालयातच ते मृत्यूवस्थेत आढळून आले. ही घटना रात्री ९.१५ च्या सुमारास घडली. विलास मेश्राम यांचे तक्रारीवरुन अर्जुनी मोरगाव पोलिसांनी र्मग दाखल केला आहे. ठाणेदार अभिषेक पाटील व सहायक ठाणेदार राजेश गज्जाळ यांचे मार्गदर्शनात पो. हवालदार इंद्रपाल कोडापे तपास करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत तिरोडा तालुक्यात शेतावर रोवणी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने ती जागीच ठार झाल्याची घटना बुधवारच्या दुपारी ३.३0 वाजतादरम्यान पालडोंगरी येथे घडली. कांतनबाई छगनलाल रहांगडाले (५२) रा. पालडोंगरी असे मृत महिलेचे नाव आहे. तेजराम सुरजलाल रहांगडाले (४१) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
तिसर्‍या घटनेत सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील एका घरावर वीज कोसळ्याने घराला आग लागली. तसेच दार बंद करीत असतानाच विजेच्या धक्याने एका ३0 वर्षीय महिलेला पक्षाघाताला बळी पडावे लागले. श्यामकली नरेश लिल्हारे (३0) असे त्या जखमी महिलेचे नाव आहे. गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु आहे.
दि. ११ ऑगस्टला रात्री ११ ते १२ वाजताच्यादरम्यान आकाशात अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला. या आवाजाने झोपलेले लोक हादरुन जागे झाले. आपल्या घरावरच वीज कोसळते की काय, असे अनेकांना वाटले व लोक तासनतास झोपी गेले नाही. याचदरम्यान कुनबीटोला (कावराबांध) येथील लालचंद चंफुलाल लिल्हारे यांच्या घरावर वीज कोसळली व छप्परावरील धाब्यावर ठेवलेले तणीस व घराचे छत जळून राख झाले. त्याच छपराखाली झोपून असलेले लालचंद लिल्हारे (६0) त्याची पत्नी उर्मिला लिल्हारे (५५) व त्यांचा नातू वेळीच जागे झाल्याने आगीपासून थोडक्यात बचावले. परंतु सून शामकली नरेश लिल्हारे (३0) ही लघुशंकेवरुन घरी आत प्रवेश करतेवेळी दार लावत होती. तिला विजेच्या धक्का बसला आणि ती खाली बेशुद्ध पडली. या धक्क्याने तिचे डावे अंग लकवाग्रस्त झाले असून शरीराची डावी बाजू काळी झाली आहे.
तिला तातडीने गावात प्राथमिक उपचार देण्यात आले. सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला केटीएस रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे उपचार सुरु आहे. लालचंद लिल्हारे यांचे कुटुंब शेतमजूरी व अवलंबून असतो. अशात दुहेरी आर्थिक संकट ओढावले आहे.