नागपुरात उघडणार कायमस्वरुपी कौशल्य विकास अकादमी- बडोले

0
13

दोन दिवसीय सुशिक्षित बेरोजगारांच्या मेळाव्याचे उद्घाटन

नागपूर, दि. १७ : २०२० मध्ये जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण होणार आहे. या तरुणांच्या हाताला कौशल्यावर आधारित काम मिळावे. ती कौशल्य यांच्यात आत्मसात व्हावीत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, नागपूर येथे कायमस्वरुपी कौशल्य विकास अकादमीच्या जागेची पाहणी सुरु असून लवकरच येथे ती सुरु करण्यात येईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सुशिक्षित बेरोजगारांच्या नाव नोंदणी मेळाव्यात बोलत होते.
यावेळी बार्टीचे महासंचालक डी. आर. परिहार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष एस. जी. गौतम, प्रकल्प संचालक उमाकांत शेरकर, वर्षा लड्डा, अरुण बमनोटे, उपायुक्त सुरेंद्र पवार, जात पडताळणी समिती क्रमांक १, नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, सहायक आयुक्त (समाज कल्याण) मंगेश वानखेडे, समाज कल्याण अधिकारी (जि. प.) सिद्धार्थ गायकवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बार्टी आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने नागपूर विभागातील पाचवी ते पदवीधर बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रशिक्षण आणि रोजगारासाठी नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज १७ ऑगस्ट रोजी चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर तर उद्या १८ ऑगस्ट रोजी गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी सुरु राहणार आहे. कन्स्ट्रक्शन, जेम्स ॲन्ड ज्वेलरी, कॅपिटल गुडस् , ऑटोमोटिव्ह, प्लम्बिंग, आयटी आणि आयटी. ई.एस, बी. एफ. एस. आय., टेलिकॉम, ट्रॅव्हल टुरिझम ॲन्ड हॉस्पिलिटी, हेल्थ केअर, रिटेल, आय. टी. लॉजिस्टिक, केमिकल ॲन्ड पेट्रो केमिकल्स, मीडिया ॲन्ड इंटरटेंमेंट, सेक्युरिटी, इलेक्क्ट्रॉनिक्स यासह १३१ अभ्यासक्रमांसाठी नाव नोंदवून ७९ कंपन्यात काम मिळणार आहे. त्या ७९ कंपन्यांसोबत बार्टी आणि सामाजिक न्याय विभाग समन्वयाचे काम करत आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना चार हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीसाठी हा विभाग नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे मोफत प्रशिक्षण देत असल्याचे राजकुमार बडोले यांनी सांगितले.
यावर्षी नागरी सेवा परीक्षांसाठी राज्य शासनाने ५० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे पाठविले आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभर असे मेळावे बार्टी व सामाजिक न्याय विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण कालावधीनंतर हे कुशल मनुष्यबळ तयार होऊन ७९ कंपन्यांमध्ये त्यांना ८ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल, असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितले.
त्याशिवाय जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी राज्यशासन विशेष मेळावे घेणार असून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांच्यासाठी राज्यभर वेगळ्या संस्था सुरु करणार असल्याचेही बडोले म्हणाले.
१४ एप्रिल २०१६ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जन्म शताब्दी असल्यामुळे व २८ नोव्हेंबर २०१५ हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १२५ वी पुण्यतिथी असल्याने २०१५ हे पर्व सामाजिक न्याय समता वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व समता वर्षाच्या निमित्ताने सर्व जाती व धर्माचे कलावंत (एकटा कलाकार/ कलाकारांचा समूह) यांच्याकडून समता, सामाजिक न्याय, बंधुत्व, वैज्ञानिक जाणीव, जागृती, जातीय दुर्भावना व अंधश्रद्धेचे निर्मूलन, आंतर जातीय विवाह या तत्सम विषयीची तसेच याबाबत थोर समाज सुधारक आणि संतांचे तत्वज्ञान समाजात व विशेषकरुन युवक युवती आणि शालेय विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्थेतील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांच्यामध्ये विविध कलेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी बार्टी, पुणे अर्ज मागविण्यात येत आहे.तरी इच्छुक संबंधित कलावंतांनी अर्ज करावा असे आवाहन, बार्टी, पुणेकडून करण्यात आले आहे.