अखेर ‘त्या’ तीनही वीज अभियंत्यांचे निलंबन रद्द

0
9

असहकार आंदोलन : ऊर्जामंत्र्यांनी घेतला धसका

गोंदिया दि.२१: वीज वितरण कंपनीच्या तीन अभियंत्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचारी संयुक्त कृती समितीने बुधवारी (दि.१९) रामनगर कार्यालयात असहकार आंदोलन केले. या आंदोलनाचा धसका घेत राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या अभियंत्यांच्या निलंबन आदेश रद्द केला. मात्र त्या वीज अभियंत्यांच्या कामाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
मंगळवारी उर्जामंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या येथील आढावा बैठकीत केटीएस रूग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मांडण्यात आली होती. याप्रकरणी उजार्मंत्र्यांनी अतिरीक्त कार्यकारी अभियंता सुहास धामनकर, सहायक अभियंता सुमित पांडे यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले. तसेच उपकार्यकारी अभियंता नावेद शेख हे अपडाऊन करीत असून पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार काहींनी मांडली. त्यावर उर्जामंत्र्यांनी शेख यांनाही निलंबीत करण्याचे आदेश दिले होते.
मात्र वीज कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू करताच या आंदोलनाचा धसका घेत उर्जामंत्र्यांनी तिन्ही अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेतले. तसेच याबाबत इंजिनियर्स असोसिशएनचे सरचिटणीस सुनिल जगताप यांनी येथील पदाधिकार्‍यांना निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती दिली व त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात कृती समितीचे हरीष डायरे, विवेक काकडे, सुनिल मोहुर्ले, दिगंबर कटरे, राजू गोंधरे, सचिन उके, सुनिल रेवतकर, सरोज परिहार, विजय चौधरी, एस.एस.फुंडे, अशोक ठवकर, गणेश चव्हाण, विश्‍वजीत मेंढे, रमेश महारवाड यांच्यासह मोठय़ा संख्येत कर्मचारी सहभागी झाले होते.