जानेवारीपर्यंत देणार धापेवाडाचे पाणी : आ. रहांगडाले यांची ग्वाही

0
8

बेरडीपार येथे जलपूजन समारंभ

तिरोडा दि.२१: तालुक्याच्या बेरडीपार (काचे) येथे जलयुक्त शिवार अभियान २0१५ अंतर्गत मामा तलावाचे खोलीकरण अदानीने पूर्ण केले होते. तेथे जल पूजनाचा समारंभ घेण्यात आला. जलसाठा तयार करून शेतकर्‍यांचा विकास व्हावा याकरिता काम करणार्‍या यंत्रणेने जागेची निवड करताना योग्य ती काळजी घ्यावी. काम करण्यापूर्तीच भावना न ठेवता योग्य जागेची निवड करावी, असे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी उपस्थित अधिकारी वर्गास दिले.जलपूजनाचा कार्यक्रम शनिवार (दि.१५) रोजी बेरडीपार येथे करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी तिरोडा पं.स. सभापती उषा किंदरले होते. आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी पं.स. उपसभापती डॉ. किशोर पारधी, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, सरपंच जोत्स्ना टेंभेकर, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, तहसीलदार चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले, राजेश तुरकर उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांनी जलयुक्त शिवार योजनेचे महत्व आणि जलसाठय़ाचे महत्व याबद्दल माहिती दिली. या योजनेकडे जिल्हाधिकारी तसेच महसूल यंत्रणेच्या नियंत्रणाबद्दल माहिती दिली. पाण्याचा साठा करून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जि.प. सदस्या राजलक्ष्मी तुरकर यांनी, आपल्या क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई खूप आहे. बोअरवेल, विहिरी खोदल्या जातात. मात्र पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही. शेतकर्‍यांना शेतीकरिता वारंवार पाण्याची टंचाई होत असल्याने शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. यासाठी उपस्थित आ. विजय रहांगडाले यांनी प्रयत्न करावे, अशी त्यांनी मागणी केली. पं.स. सभापती उषा किंदरले यांनी, पं.स. स्तरावर राबविण्यात येणार्‍या योजना निधीअभावी अडचण निर्माण होते, ती निधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
आ. विजय रहांगडाले यांनी, पाणी साचण्याची समस्या व अपेक्षा राज्य शासनाच्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे.या योजनेतून सामान्य शेतकर्‍यांना व नागरिकांना याचा लाभ व्हावा. गुराढोरांना पाणी मिळावे याकरिता योजना राबविण्यात यावे. शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा योग्य रितीने मिळत नाही. तसेच या योजनेतून शेतकर्‍यांना चांगलाच लाभ होणार आहे. पाणी अडविण्याचे प्रकल्प तयार करताना अभियान राबविताना लोकसहभागातून व त्यांना विश्‍वासात घेवून अधिकार्‍यांनी पूर्ण करावेत, असे आदेश त्यांनी दिले.
अर्जुनी, सेजगाव क्षेत्रात पाणी टंचाई निश्‍चित दूर केली जाईल. धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा पाणी येत्या डिसेंबर-जानेवारी महिन्याअखेर खळबंदा जलाशयात घातला जाईल, अशी ग्वाही आ. विजय रहांगडाले यांनी दिली. पाटबंधारे व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना आ. रहांगडाले यांनी सांगितले की, मामा तलावाचे खोलीकरण करावे. सिंचनाचे क्षेत्र वाढवावे लागणारा निधी कधीही कमी पडू देणार नाही. तो शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभाग तिरोडा, तालुका कृषी अधिकारी तिरोडा, तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि गट विकास अधिकारी तिरोडा यांनी संयुक्तरित्या केले होते. आभार तहसीलदार चव्हाण यांनी मानले.