श्रमिक एल्गारच्या विरोधात पत्रकारांची धडक

0
10

चंद्रपूर दि. २६:: सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील पत्रकारांनी काढलेल्या मोर्चाने इतिहास घडविला. लोकमतचे सावली येथील तालुका प्रतिनिधी उदय गडकरी आणि लोकमतच्या संपादकांविरूद्ध श्रमिक एल्गार संघटनेच्या नेत्या अ‍ॅड. पोरोमिता गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहा पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या निषेधार्र्थ मंगळवारला जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला.

श्रमिक एल्गारने सहा ठिकाणी दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यात याव्या, पत्रकारांना कायद्याचे संरक्षण देण्यात यावे व पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणावा, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांच्या विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा पत्रकार संघ (रजि.), चंद्रपूर इलेक्ट्रॉनिक मीडिया आदी पत्रकार संघटनांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. गिरणार चौकातून निघालेल्या मूक मोर्चात चिमूर, वरोरा, भद्रावती, घुग्घुस, माजरी, राजुरा, जिवती, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, सावली, गडचांदूर, मूल, गोंडपिंपरी, बल्लारपूर, सिंदेवाही, कोरपना, नागभीड येथील शेकडो पत्रकारांनी सहभाग नोंदविला. यात प्रामुख्याने चिमूर तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र पत्रकार संघ वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, यासह सर्व तालुका पत्रकार संघाचा प्रामुख्याने समावेश होता. १२ वाजता गिरणार चौक येथून निघालेला मूक मोर्चा दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. पत्रकारांच्या शिष्ठमंडळाने प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात जावून २० कलमी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना निवेदन दिले आणि चर्चा केली. शिष्टमंडळामध्ये विविध पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.