लग्नासाठी तरुणी पाण्याच्या टाकीवर

0
17

चंद्रपूर दि. २६- “शोले‘ चित्रपटातील एका दृश्‍याची पुनरावृत्ती येथे झाली खरी; मात्र पात्र बदलले होते. “शोले‘त बसंतीसाठी वीरू पाण्याच्या टाकीवर चढला होता. चंद्रपुरातल्या एका टाकीवर असेच चित्र दिसले. फक्त टाकीवर वीरू नाही, तर बसंतीच वीरूसाठी चढली. मात्र, वीरूने बसंतीला होकार दिला तर नाहीच, उलट प्रेमदिवाणी बसंतीलाच नऊ तासांच्या “शोले‘नाट्यानंतर पोलिस कोठडीची हवा खावी लागली.
ओळखीच्या तरुणाशी आपले लग्न करून द्या या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील २६ वर्षीय युवतीने पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. तब्बल अडीच तास पोलिस यंत्रणा, तिचे नातेवाईक तसेच गावकऱ्यांचा जीव या प्रकारामुळे टांगणीला लागला होता. कशीबशी समजूत घालून तिला उतरवल्यावर तिच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे.

मंगळवारी दुपारी एक ते साडेतीनच्या दरम्यान ही नाट्यमय घटना घडली. दुर्गापूर येथील वेस्टर्न कोल फिल्ड्स येथील क्वार्टरमध्ये राहणाऱ्या या युवतीला मानसोपचाराची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमीही विचित्र आहे. २६ वर्षीय अंजली (नाव बदलले आहे) २०१३ मध्ये तिच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच गावातील अजय नावाच्या युवकासह पळून गेली होती. दुर्गापूर पोलिस ठाण्यात तक्रारीवरून अजयविरुद्ध पळवून नेल्याचा गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, पळून गेल्यावर दुसऱ्याच दिवशी ती अजयसह परतही आली. त्यावेळी दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्यास नकार दिला. प्रकरण वाढून त्या त्याच्याविरुद्ध ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. महिनाभर कारागृहात राहिल्यावर अजय जामीनावर बाहेर आला होता. दरम्यान, या घटनाक्रमानंतर अंजलीचे आईवडील, नातेवाईक तिला घरी ठेवायला तयार नसल्याने ती काही काळ नातेवाईकांकडे तर काही काळ नागपुरातील महिला सुधारगृहात राहिली. तेथूनही सतत पळून जायची. अलिकडेच तिला पुन्हा अजयशी लग्न करावेसे वाटत होते. त्यासाठी ती पोलिसांकडेही तगादा लावत होती. पोलिसांनी अजयला विचारल्यावर त्या प्रकारानंतर आपल्याला लग्नाच्या भानगडीत पडायचे नसल्याचा पवित्रा त्याने घेतला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.