सामाजिक न्यायाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील -राजकुमार बडोले

0
18

मिनी ट्रॅक्टर्सचे बचतगटांना वाटप
गोंदिया,दि.११ : सामाजिक न्याय विभागाच्या आणि त्याच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात १० सप्टेंबर रोजी समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सहा स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री.बडोले बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.माजी कृषी समिती सभापती उमाकांत ढेंगे, महिन्द्रा ट्रॅक्टर्स कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सचिन राजमाने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जास्तीत जास्त गरीब शेतकरी व बचतगटांच्या महिलांना सक्षम करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर योजना महत्वाची आहे. या योजनेत फेरबदल करुन आणि जास्तीत जास्त निधीची यासाठी तरतूद करण्यात येईल. जास्तीत जास्त भूमिहीनांना जमीन देण्यासाठी दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेत बदल करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, नागपूर, पूणे आणि नाशिक येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसतीगृह बांधण्यात येणार आहे. ज्या तालुक्यात वसतीगृह नाही तेथे विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यात येतील. ७९ प्रकारच्या विविध अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा प्रयत्न असून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरु करण्याचा विचार असल्याचे श्री.बडोले यांनी सांगितले.
दारिद्रय रेषेवरील लाभार्थ्यांसाठी घरकूल योजना सुरु करण्याचा विचार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळामार्फत लाभार्थ्यांसाठी कर्ज योजना आहे. महामंडळातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे योजना राबवितांना अडचणी निर्माण होतात. महामंडळातील रिक्त पदे लवकर भरुन ही महामंडळे सक्षम करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ देता येईल. आश्रमशाळा व वसतीगृहांसाठी जमीन उपलब्ध झाल्यास त्वरित इमारती बांधण्यात येतील असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. ..२
जि.प.अध्यक्ष श्रीमती मेंढे म्हणाल्या, बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षम होतांना दिसत आहे. बचतगटाच्या माध्यमातून जो व्यवसाय आपण सुरु करणार आहे तो व्यवसाय आपण चांगला व यशस्वीपणे करणार आहोत अशाच व्यवसायाची निवड बचतगटांनी करावी. घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच करावी. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
आमदार रहांगडाले म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी आपली प्रगती करावी. बचतगट हे सक्षमपणे चालले पाहिजे. मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून महिला बचतगट हे सक्षम झाले पाहिजे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना व विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा. असेही श्री.रहांगडाले म्हणाले.
प्रभारी जिल्हाधिकारी मोहिते यांनी महिलांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांना सक्षम करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता विषद केली. यावेळी श्री.राजमाने यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचतगट रामपूर (माताटोली) ता.आमगाव, यशोधरा स्वयंसहायता महिला बचतगट तेढवा ता.गोंदिया, रमाबाई आंबेडकर महिला स्वयंसहायता बचतगट कुडवा ता.गोंदिया, सहयोग स्वयंसहायता महिला बचतगट गिधाडी ता.गोरेगाव, उपासना स्वयंसहायता महिला बचतगट चिचगावटोला ता.गोरेगाव या सहा महिला बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी पाहुण्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केले. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी केले. संचालन व आभार डी.आर.चव्हाण यांनी मानले. यशस्वीतेसाठी वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अंकेश केदार, संगणक ऑपरेटर लक्ष्मण खेडकर, वरिष्ठ लिपीक राजेश खरोले, श्री.पराते, श्री.जाधव, श्री.कळमकर व श्री.बावने यांनी परीश्रम घेतले.