न्यायालयाचे आदेश :जलसंपदा कार्यालयावर जप्ती

0
5

अमरावती दि.१९: मोर्शी तालुक्यातील घोडदेव सिंचन तलावासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्यात त्यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही सिंचन विभागाने मोबदला दिला नाही. त्यामुळे न्यायालयाचे अवमान केल्याप्रकरणी शुक्रवारी येथील लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या कॅम्प स्थित कार्यकारी अभियंता कार्यालयावर रविवारी जप्तीची कारवाई करण्यात आली.
घोडदेव येथील लघुसिंचन तलावासाठी परिसरातील ५५ शेतकर्‍यांकडून संत्राबागांसह मोठी सुपीक शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली होती.मात्र, या शेतजमिनीचा पुरेसा मोबदला सिंचन विभागाने दिला नाही. त्यामुळे ५५ शेतकर्‍यांपैकी काही शेतकर्‍यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीशांच्या न्यायालयात वाढीव मोबदल्यासाठी धाव घेतली. याप्रकरणी न्यायाधीशांनी उज्ज्वला संजय पांडव, आशा खुशालराव पांडव या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचा सुमारे १३ लाख ७९ हजार ९६७ रूपयांचा वाढीव मोबदला त्वरित देण्याचे आदेश दीड वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, न्यायालयाचे आदेश असतानाही लघुसिंचन जलसंधारण विभागाने या आदेशांची अंमलबजावणी केली नाही. अखेर न्यायालयाने या कार्यालयावर जप्तीचे आदेश दिलेत.आदेशानुसार १८ सप्टेंबर रोजी न्यायालयाचा आदेश घेऊन बेलिफ व संबंधित शेतकर्‍यांनी लघुसिंचन विभाग स्थानिक स्तर यांचे कार्यालय गाठून याबाबत कार्यकारी अभियंता शं ना. तायडे यांच्याशी चर्चा केली. मात्र, वाढीव मोबदला देण्यासाठी अद्याप निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली.