मुद्राच्या माध्यमातून जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न- पालकमंत्री बडोले

0
6

मुद्रा योजना मेळावा
लाभार्थ्यांना मंजूरीपत्र वितरण
गोंदिया,दि.२८ : देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. बेरोजगारीवर मात करण्यासोबतच अनेकांना स्वावलंबी करुन त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज (ता.२८) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अग्रणी जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ.विजय रहांगडाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, भाजपा शहाराध्यक्ष भरत क्षत्रीय, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक मिलींद कंगाली, अग्रणी जिल्हा बँकेचे अनिलकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, बँकेच्या कर्ज वितरणाबाबत अनेकांच्या गैरसमजूती आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून हया गैरसमजूती दूर होण्यास मदत होईल. काही बँका हया विशिष्ट लोकांचे हित बघणाऱ्या होत्या असा प्रश्न पडत होता. मुद्राच्या माध्यमातून कर्ज त्वरित देण्यात येईल. योजनेची यशस्वीता ही त्या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर व लाभार्थ्यांवर अवलंबून असते.
देशातील सामान्य माणसाला कर्ज देण्याचे काम मुद्रा योजनेच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, कुठलीही सुरक्षा ठेव न मागता कर्ज देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी सुरु केलेली ही मुद्रा योजना अत्यंत क्रांतीकारी आहे. अत्यंत छोटा व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यक्तीला कर्ज देण्याचे काम या योजनेतून करण्यात येईल. युवावर्गाला स्वावलंबी करण्यास आधार ठरणार आहे. केवळ उद्दिष्ट आहे म्हणून बँकांनी ही योजना राबवू नये.
आ.रहांगडाले म्हणाले, उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना चांगली आहे. बँकांनी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गरजूंना कर्ज उपलब्ध करुन दयावे. बेरोजगारांना यानिमीत्ताने रोजगार उपलब्ध होण्यास मदत होवून त्यांच्या विकासाला चालना मिळेल. मुद्रा योजनेसाठी जास्तीत जास्त गरजूंना कर्ज वितरण करण्याच्या दृष्टीने शिबिरे घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
यावेळी हिरामन उरकुडे, चेतलाल पटले, प्रतिभा खांडेकर, राजरतन दहिवले, प्रकाश ब्रम्हपुरे, सुदेश उरकुडे, दिलीप रावडे, अतुल मिश्रा, घनश्याम मानकर, दिलेश्वर पंचबुद्धे, शैलेश भिवगडे, प्रवीण ठाकरे, राजेश येडे, गोपाल बनकर, सुरेंद्र सोनवणे, राजेश तावडे, गोपाल बहेकार, विनोद राऊत, दिनेश कठाडे, गणेश उईके या लाभार्थ्यांना मुद्रा योजनेच्या शिशू योजनेअंतर्गत कर्जाच्या मंजूरीपत्राचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ९९० लाभार्थ्यांना ३ कोटी ३० लक्ष रुपयांचे शिशू योजनेअंतर्गत कर्ज वितरण प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत करण्यात आले.
प्रास्ताविकातून अग्रणी जिल्हा प्रबंधक विवेक लखोटे यांनी ग्रामीण भागातील गरीब व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शिशू, किशोर व तरुण हया योजना राबविण्यात येत आहेत. कर्ज मंजूरीची प्रक्रिया या योजनेअंतर्गत अत्यंत सोपी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार अग्रणी बँक अधिकारी शिवाणी दुबे यांनी मानले.