२६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा होणार

0
14

नागपूर दि. २९ –- देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशात सर्व विद्यापीठांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. आयोगाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पाठविलेल्या परिपत्रकात संविधान दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या या लढ्याला यश आले.

माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे जिल्हा परिषदेत मुख्य कार्य अधिकारी असताना नागपूर जिल्ह्यात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला होता. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे राज्यभरात कौतुक झाले. तत्कालीन शासनाने राज्यभरातील शाळांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याचा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला बहाल करण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी लागू केले. या दरम्यान, खोब्रागडे यांनी २६ नोव्हेंबर हा दिवस राज्यात नव्हेतर देशात संविधानदिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी पाच वर्षांपासून रेटून धरली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंतप्रधान, तत्कालीन यूजीसीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांना या मागणीचे निवेदन दिले. त्यांनी शिफारस केली होती. विशेष असे संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून खोब्रागडे यांनी सातत्याने हा विषय लावून धरला. त्यांनी सुरू केलेल्या या लढ्याला यश मिळाले. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्यासह यूजीसीचे आभार व्यक्त केले.