स्वाभिमान संकेतस्थळाच्या माध्यमातून शासनाच्या योजना ग्रामपातळीपर्यंत पोचविणार-मंत्री बडोले

0
8

नागपूर, दिनांक ९ : गोरगरिब, दलित आणि सर्वसामान्यांपर्यंत राज्य शासनाच्या योजना पोहचाव्यात. त्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि ती मिळविताना कुठेही अडचण येऊ नये, यासाठी ‘स्वाभिमानङ्क हे संकेतस्थळ नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘स्वाभिमानङ्क या संकेत स्थळाच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार समीर मेघे, प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, संकेतस्थळाचे डिझायनर अजित पारसे, अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष सुभाष पारधी, डॉ. विरल कामदार, मातृसेवा संघाच्या अध्यक्ष अरुणा बाभुळकर, सचिव लता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
समता व सामाजिक न्याय वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाकडून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे, मागासलेल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे संकेतस्थळ नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास त्यांना व्यक्त केला. तसेच स्वतः आणि समाजाच्या विकासासाठी जास्तीत – जास्त नागरिकांनी या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कटिबद्ध असल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘स्वाभिमानङ्क च्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आणि अगदी सहज सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. शासनाच्या सर्व सेवांची माहिती देण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील असेल. सद्य:स्थितीत शासनाच्या १२ योजनांची माहिती स्वाभिमानच्या छताखाली पुरविण्यात येत आहे, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

तत्पूर्वी अजित पारसे यांनी ‘स्वाभिमानङ्क चा सर्वसामान्य नागरिकांना होणारा उपयोग आणि त्यांची हाताळण्याविषयी माहिती दिली.