साम्राज्यवादी शक्तींना क्रांतिकारी विचार नकोत: विरा साथीदार

0
8

गडचिरोली,दि..२१: इंग्रजांनी सरंजामशाहीचा नाश करुन भांडवलशाही आणली. आता मात्र ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही एकजीव झाल्या असून, शोषणाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे, असे परखड मत “कोर्ट” चित्रपटाचे प्रमुख कलावंत व पुरोगामी चळवळीतील खंदे कार्यकर्ते विरा साथीदार यांनी व्यक्त केले. शहिदांचे विचार पेरल्याने आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, अशी भीती वाटत असल्याने साम्राज्यवादी शक्ती क्रांतिकारी विचारांच्या कार्यक्रमांना विरोध करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आज सकाळी प्रेसक्लब भवन येथे आयोजित “मीट द प्रेस” या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आदिवासी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनिष कुंजाम, ज्येष्ठ साहित्यिक प्रभू राजगडकर, सामाजिक कार्यकर्ते महेश राऊत, भाकपचे जिल्हा सचिव डॉ.महेश कोपुलवार, विनोद झोडगे उपस्थित होते. “कोर्ट”चित्रपटाबाबत विरा साथीदार म्हणाले की, भारतात मागील सव्वाशे वर्षांच्या काळात असा चित्रपट झाला नाही. हा चित्रपट प्रारंभी ३२ देशांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर तो भारतात प्रदर्शित झाला. ५५ फिल्म फेस्टिवलमध्ये तो दाखविण्यात आला आणि तब्बल ३२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. आता ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामांकन झाले आहे.