बाबूपेठचा उड्डाण पूल -प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा

0
11

चंद्रपूर : दि.4: चंद्रपुरातील बाबूपेठ येथील रेल्वे रूळावरील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल उभारण्याची स्थिती अंतीम टप्प्यात आली असली तरी, या पुलाच्या निर्मितीसाठी ६१ कोटी ५७ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकाला नगर विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा मात्र कायमच आहे. ही मान्यता मिळाल्यावरच आणि भूसंपादनाची कार्यवाही झाल्यावरच या पुलाच्या निर्मीतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.

बाबूपेठच्या उड्डाण पुलाच्या निर्मीतीभोवती शहराच्या विकासाचे राजकारण फिरत असले तरी अद्यापही या पुलासाठी असलेली तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नाही, हे तेवढेच स्पष्ट आहे. दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्यांनीच एका प्रसिद्धी पत्रकातून ही बाब स्पष्ट केली आहे. चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांच्या मतदार संघात येणाऱ्या बाबूपेठच्या उड्डाण पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे. त्यामुळे या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना अकारण प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पुलाच्या मान्यतेतील सर्व अडथळे दूर झाल्याचे आमदार श्यामकुळे यांनी यापूर्वी सांगितले असले तरी, एवढ्या महिन्यानंतरही या पुलाच्या निर्मीतीच्या कामाला न झालेली सुरूवातच सर्व काही सांगून जाण्यास पुरेशी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे उड्डाण पुलासाठी सर्वसाधारण आराखडा तयार केला आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे अशा दोन विभागाचे लोहमार्ग रस्त्याला क्रॉस करतात. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या नकाशाला तत्वत: मान्यता दिली असून येथे पादचारीसाठी आणि दुचाकींसाठी तरतुद करण्यासाठी कळविले आहे. त्यानुसार अंडरपासचे नकाशेही मंजुरीसाठी रेल्वेकडे पाठविले आहेत.