नोकरीच्या नावावर फसविणारा रेल्वे कर्मचारी जाळ्यात

0
11

तुमसर :,दि.६- नोकरी लावून देतो म्हणून बेरोजगार तरुणाला १0 हजार रुपयांची मागणी करणार्‍या एका वरिष्ठ रेल्वे लिपिकावर बिलासपूर येथील व्हीजीलेन्स पथकाने कारवाई केली. सदर कारवाई तुमसर रोड येथे पी.डब्लू.आय. कार्यालयात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली. वरिष्ठ लिपिकाचे नाव गोपनीय ठेवले आहे. या प्रकारामुळे तुमसर रोड रेल्वे प्रशासनात एकच खळबळ माजली.
नोकरी लावून देतो म्हणून एका बेरोजगार तरुणाकडे दहा हजाराची मागणी तुमसर रोड येथील वरिष्ठ रेल पथ निरीक्षक कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाने मागणी केली होती. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास बिलासपूर येथील व्हीजीलेंसचे एक पथक कार्यालयात दाखल झाले. यासंबंधात त्यांनी संबंधित वरिष्ठ लिपिकाची चौकशी करून कार्यालयातून या प्रकरणातील दस्ताऐवज हस्तगत केले. तक्रारकर्त्या युवकाचे नाव रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गोपनीय ठेवले. याप्रकरणात स्थानिक रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते. संबंधित वरिष्ठ लिपिकावर विभागीय चौकशी करण्याचा अहवाल व्हीजीलेंस पथकाने दिल्याची माहिती आहे. वरिष्ठ लिपिकाजवळ रक्कम भेटली नाही. दस्ताऐवज हा पुरावा येथे ग्राह्य धरण्यात आला. यात संभाषण असल्याचे समजते.