वचनपूर्तीतून राज्याच्या विकासाची ग्वाही – राजकुमार बडोले

0
10

गोंदिया दि, ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान, शेतकऱ्यांची सावकारी कर्जमाफी, कौशल्य विकासातून रोजगार व उद्योगाला चालना आणि संकटात सापडलेल्या धान उत्पादकांना बोनस स्वरुपात अतिरीक्त मदत करुन राज्य शासानाने मदतीचा हात दिला आहे. दिलेल्या आश्वासनाची एका वर्षात वचनपूर्ती करुन राज्याच्या विकासाची ग्वाही दिली आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने एका वर्षाच्या कार्यकाळात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि सुरु केलेल्या लोकाभिमुख योजनेवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पहिले पाऊल वचनपूर्तीचे या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला पालकमंत्र्यानी आज (ता.६) सडक अर्जुनी येथे त्यांच्या निवासस्थानासमोर हिरवी झेंडी दाखविली यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोंदिया जिल्हा मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष झामसिंग येरणे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत गहाणे, गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९२१-२२ या कालावधीमध्ये लंडन येथे शिक्षण घेत असतांना वास्तव्य केलेले घर राज्य सरकारने खरेदी केले असून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून माझ्या पुढाकारातून एक ऐतिहासिक काम राज्य सरकारने केले आहे. मुंबई येथील इंदू मिलची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी खरेदी केली आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून संकटाच्या काळात या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली आहे.
जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देवून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्हयातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक खुप खाली असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन तसेच समाजातील विविध घटकांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्ररथावर जलयुक्त शिवार अभियान , महाराजस्व अभियान, धान उत्पादकांना दिलासा, सावकारी कर्जमुक्ती, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता, सिंचनासाठी कृषी पंपाची जोड, स्वच्छ महाराष्ट्र अभियान या विषयावरील सचित्र माहिती चित्ररथावर लावण्यात आली असून जिंगल्सद्वारे योजनांची माहिती तसेच चित्ररथातील टिव्हीवर विविध योजनांची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. हा चित्ररथ जिल्हयातील अनेक गावात जावून ग्रामीण व शहरी जनतेपर्यंत राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती पोहोचविणार आहे. कार्यक्रमाचे संचालन साई इंटरप्राईजेसचे संचालक उमेश महतो यांनी केले. प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. यावेळी नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती..