लोकसहभागातूनच विकासाला गती मिळेल- डॉ.एस.एन. सुब्‍बाराव

0
7
वर्धा   दि. ८: सामान्‍य मानसाचा विकास हे ध्येय समोर ठेवून विकासाच्‍या प्रत्‍येक प्रक्रियेत लोकसहभाग वाढविल्‍यास जनतेमध्‍येही आपल्‍या विकासाबद्दलची जागृतता व राष्‍ट्रीय एकात्‍मतेची भावना निर्माण होईल, असे प्रतिपादन जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत व राष्‍ट्रीय युवा योजनेचे निदेशक डॉ.एस.एन. सुब्‍बाराव यांनी केले.शासनाच्‍या वर्षपूर्तीनिमित्‍त जिल्‍हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित ‘विकासपर्व’ या छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. सुब्‍बाराव बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल, सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे डॉ.श्रीराम जाधव, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, आशिष गोस्‍वामी, इक्राम हुसेन आदी उपस्थित होते.वर्धा जिल्‍ह्यात राबविण्‍यात आलेल्‍या विविध विकास योजना, जलयुक्‍त शिवार अभियान, पर्यटनस्‍थळे तसेच लोक जीवनाचा आढावा या छायाचित्र प्रदर्शनीच्‍या माध्‍यमातून घेण्‍यात आला आहे.

छायाचित्राची पाहणी करताना डॉ. सुब्‍बाराव म्हणाले, जलसंधारणाचे लहान लहान प्रकल्‍प अत्‍यंत आवश्‍यक आहेत. या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढवून ही योजना माझी आहे व माझ्यासाठी आहे, अशी भावना निर्माण होणे गरजेचे आहे. राष्‍ट्रीय एकात्‍मता व बंधूभावाची शिकवण सेवाग्राम येथून महात्‍मा गांधी यांनी दिली असून जगामध्‍ये विविधता असलेला भारत हा एकमेव देश आहे. विसावे शतक हे पाश्चिमात्य देशाचे होते. तेथे भारताला स्‍थान नव्‍हते, परंतु एकविसावे शतक हे भारताचे आहे. कारण महात्‍मा गांधी, स्‍वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारावर आधारित हे शतक असल्‍यामुळे संपूर्ण जग भारताकडून अपेक्षा करीत आहे.

जिल्‍ह्यातील महत्‍वपूर्ण निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आढावा, राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सेवाग्राम भेट, अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते शेतकऱ्यांना सवलतीच्‍या दरात अन्‍न धान्‍य योजनेपासून विविध योजनाचा शुभारंभ उद्योग, शिक्षण, शेती, जलसंपदा आदी विविध विभागाच्‍या योजनाच्‍या शुभारंभाच्‍या प्रसंगीची छायाचित्रे प्रदर्शनीमध्‍ये आकर्षकपणे सादर करण्‍यात आले आहे.