राज्य शासनाची धान खरेदी केंद्राची घोषणा फसवी-आ.जैन

0
10

गोंदियादि. ८- : १ नोव्हेंबरपासून राज्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची राज्य शासनाने केलेली घोषणा फसवी ठरल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र जैन यांनी केली आहे. किमान शेतकर्‍यांच्या जिवाशी तरी खेळू नका, असे सुचवून धान खरेदी केद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली.आमदार जैन यांनी बेरार टाईम्स सोबत चर्चा करतांना सांगितले की, शेतकर्यांची दिशाभूल करुन राज्यातले सरकार सत्तेत आले आहे.विरोधी पक्षात असताना धानाला 3 हजाराचा भाव देण्याची तयारी दाखविणारे आत्ता 1000 रुपये सुध्दा भाव देऊ शकत नसल्याची स्थिती असून शेतकरी पडक्या दरात धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने विकत असल्याचे सांगितले. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पालकमंत्री हे फक्त सांगकामे असून त्यांना स्वतःनिर्णय घेण्याचाच अधिकार नसल्याने ते काय या दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्यांच्या समस्या सोडवणार असेही सांगितले.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात एकाही ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेले नसताना स्थानिक लोकप्रतिनिधीही हाच ढिंडोरा पिटत आहेत. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय असताना किमान लोकप्रतिनिधींनी तरीही त्यांच्या भावनांशी खेळू नये. गोदाम मालक आणि मिलर्सचा प्रश्न लवकरच सोडवू म्हणणार्‍या या सरकारने गोदाम मालकांना भाडे दिलेले नाही. आघाडी सरकारच्या काळात गोदाम मालकांना वर्षभराचे भाडे देण्यात येत होते. परंतु युती सरकार दोन महिन्याचेच भाडे देण्याची तरतुद सांगत आहेत. गोदामाला बाजार भावानुसार अधिक भाडे मिळत असतानाही गोदाम मालक सार्वजनिक बांधकाम विभागाने आखून दिलेल्या कमी दराने गोदाम भाड्याने देत आहेत. असे असतानाही राज्य शासन त्यांना भाड्याची रक्कम देण्यापासून टाळाटाळ करीत आहे.
कृषी उत्त्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री सोसायटींना अद्याप सेसची रक्कम देण्यात आलेली नाही. एकीकडे राज्य शासन उद्योगांनी थकविलेले कोट्यवधी रुपये माफ करीत आहेत. आणि दुसरीकडे शेतकर्‍यांना वेठीस धरत आहेत. शेतकर्‍याने वर्षभर राबराब राबायचे. त्यातच नैसर्गिक आपत्तीला सामोरे जायचे आणि हातात पीक आल्यानंतर पडक्या दराने धान्य विकण्याची पाळी त्यांच्यावर आणायची हा प्रकार शेतकर्‍यांच्या जीवाशी खेळणारा असून राज्य शासनाने फसव्या घोषणा करण्यापेक्षा शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी त्वरीत धान खरेदी केंद्र सुरु करावी अशी मागणी आमदार राजेंद्र जैन यांनी केली आहे.