आमदाराच्या टेबलावरच मांडल्या कुजलेल्या धानाच्या पेंड्या

0
6

सालेकसा, दि. ९ : आमदार संजय पुराम यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील शेतकर्‍यांनी हल्ला चढवून थेट त्यांच्या टेबलावरच कुजलेल्या धानाचे भारे मांडले. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी रेटून धरत शेतकर्‍यांनी पंचायत समितीचे आवार दणाणून सोडले. यावर आमदारांनी कृषीमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना परिस्थिती सांगणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.
तालुक्यात धानपिकांवर रोगांचा एवढा प्रादुर्भाव झाला की, सर्वत्र धानाचे पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकर्‍यांना धान स्वरूपात काहीच हाती येणार नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या जनावरांसाठी तणसही निघणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांसह जनावरांच्या चार्‍याची चिंताही सतावू लागली आहे. याबाबत तालुक्यातील शेतकर्‍यांनी महसूल व कृषी विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींसह आमदार व खासदारांपर्यंत समस्यांचे निवेदन सादर केले. यात शेतकर्‍यांना कुठेही मदतीची हमी देण्यात आली नाही. धानपीक नष्ट झाल्याने शेकडो शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात दिसत आहे.

शेतकर्‍यांना दिलास देण्यासाठी मागील आठ-दहा दिवसांपासून तहसीलदार प्रशांत सांगळे, पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, पंचायत समिती कृषी अधिकारी मडावे, जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, पंचायत समिती सदस्य प्रतिभा परिहार, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, दुर्गा तिराले, समाजकल्याण देवराज वडगाये यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकार्‍यांनी आपापल्या सोयीनुसार तालुक्यात दौरा केला. दौर्‍यात त्यांनी शेतातील पिकांची पाहणी केली.