रेल्वे झोन कार्यालयासाठी प्रयत्न करणार

0
12

नागपूर  दि. ९ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे झोन बिलासपूरला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील रेल्वे प्रकल्पांची कामे मार्गी लागतात. परंतु महाराष्ट्रातील प्रकल्प अपूर्ण राहतात. त्यासाठी विदर्भातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन नागपुरात झोन कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या खासदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांच्यासोबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या खासदारांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी खासदार फग्गन सिंह कुलस्ते होते. बैठकीला राज्यसभेचे खासदार अजय संचेती, बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत, राजनांदगावचे खासदार अभिषेक सिंह, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले,उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार कृपाल तुमाने यांनी नागपूर-रामटेक पॅसेंजरचा बुटीबोरीपर्यंत विस्तार करण्याची मागणी करून, गोंडवाना, विदर्भ एक्स्प्रेसला कामठीत थांबा देण्याची तसेच नागपूरला झोन तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती दिली. खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांनी रेल्वेत सुरक्षा अणि सफाईकडे विशेष लक्ष पुरविण्याची मागणी केली. बैठकीला उपस्थित खासदारांनी विविध मागण्या रेटून धरल्या. यात बालाघाट-कटंगी दरम्यान सकाळी नवी गाडी सुरु करणे, कटंगी-तिरोडा रेल्वे लाईनची निर्मिती, गोंदिया-चांदाफोर्ट भागात सर्व प्लॅटफार्मची उंची वाढविणे, दुरांतो एक्स्प्रेसला गोंदियात थांबा देणे, गोंदिया मालधक्क्याला गोंदिया शहराबाहेर स्थानांतरित करणे, बिलासपूर-नागपूर इंटरसिटीमध्ये रायपूरच्या वेळेत बदल करणे, नागपूर-नागभीड ब्रॉडगेज, वडसा-गडचिरोली दरम्यान नवी लाईन या विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रथम दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी उपस्थित खासदारांचे स्वागत करून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनमध्ये येणाऱ्या खासदारांची समिती गठित करण्याची सूचना केली. त्यांच्या हस्ते उपस्थित खासदारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बैठकीला विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल आणि अधिकारी उपस्थित होते.