पर्यटन विकास आराखडा तातडीने तयार करा पालकमंत्र्याचे निर्देश

0
11

गोंदिया दि, ९ : जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याची संधी आहे. जिल्हयातील पर्यटनस्थळांची विकास कामे वेळीच व नियोजनबध्द रितीने करण्यासाठी जिल्हयाचा पर्यटन विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ७ नोव्हेंबर रोजी जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या विकासाबाबतच्या जिल्हा पर्यटन समितीच्या आयोजित सभेत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी समितीचे पदाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगांवकर, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री शर्मा, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्हयात पर्यटनाच्या विकासाला भरपूर संधी आहे. जास्तीत जास्त पर्यटक नवेगावबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. परंतू आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. मोठ्या प्रमाणात जिल्हयात पर्यटक येण्यासाठी आता चांगल्या प्रकारचे कालबध्द नियोजन करुन जिल्हयातील इतरही पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे दर्जेदार व वेळीच झाली पाहिजे. असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नवेगावबांध येथील जलाशयाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी बोटींगची सुविधा, चौपाटीची व्यवस्था, चांगल्या प्रकारचे निवासी तंबू असल्यास पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतील. हिलटॉप गार्डनचे, सौंदर्यीकरण तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यानी यावेळी दिले.
महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक प्रतापगड येथे येतात. तेथे भाविकांसाठी यात्रेच्या काळात पिण्याच्या पाण्याची सुविधा होईल याकडे लक्ष द्यावे. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, कचारगड हे लाखो आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा व पायऱ्या बांधण्याची कामे तातडीने पूर्ण करावी. सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या तलावात बोटींगची सुविधा उपलब्ध करुन पर्यटकांना येथे आकर्षित करुन स्थानिकांना त्यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देता येईल याची चाचपणी करावी. नागझिरा अभयारण्यात पर्यटकांच्या सेवेकरीता असलेल्या टाटा पिक अप वाहनांची स्थितीही पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली.
जिल्हयातील ११ पर्यटनस्थळांच्या विकासाचा ४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे दिल्याचे श्री घाटे यांनी सांगितले. तसेच विविध विभागाकडून पर्यटनस्थळांच्या विकासाच्या करण्यात येत असलेल्या कामाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली.