कोविड लसीच्या दुसर्‍या डोससाठी विलंब करू नका : डॉ.सुवर्णा हुबेकर

0
43

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम आपण सर्वांनी भोगले आहेत. श्रावण, भाद्रपद, गौरी, गणपती सणामुळे बाजारपेठेत अनियंत्रित गर्दी उसळली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविडच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिलेला आहे. तिकडे केरळमध्ये ओणम या सणासुदीला गर्दी केल्याने पुन्हा कोविड केसेसमध्ये वाढ झालेली दिसून आले आहे. त्यामुळे कोविड विषाणूपासून सरंक्षण हवे असेल तर दूसरा डोस बरोबर 84 दिवस झाले की लगेच घ्यावे. त्यासाठी टाळाटाळ करू नका, असे आवाहन केटीएस रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी केले.

गोंदिया शहरात लसीकरणाच्या प्रमाणात दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे प्रत्येक वार्ड व प्रभागप्रमाणे लसीकरण याद्यांची पडताळणी करावी. ज्यांचा दूसरा डोस कोणत्याही कारणामुळे राहिला असेल त्यांनी त्वरित जवळच्या  लसीकरण केंद्रावर जाऊन कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे. असेही डॉ.हुबेकर यांनी गोंदियातील नागरिकांना सांगितले आहे.गोंदियात covishield व कोवॅक्सिन या दोन्ही लसीचा साठा मुबलक प्रमाणात आहे. दररोज कुंभारेनगर, केटीएस व मरारटोली, गोविंदपूर व राजस्थानी स्कूलमध्ये लसीकरण सत्र घेतले जाते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे सत्र सुरू आहेत. त्यातही ऑन स्पॉट नोंदणीची सोय असल्याने लवकर लसीकरण करून घेता येते.

त्यामुळे 18 वर्षे वरील वयोगटातील सर्व नागरिकांचे 100 टक्के संपूर्ण लसीकरण येत्या काही दिवसात पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वांनी सहाय्य करावे, असेही आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे.