आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दर्शविली कौतुकास्पद कर्तव्यनिष्ठा

0
173

गोंदिया,दि.11ः-सध्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये कवच-कुंडल मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीचा पहिला डोस द्यावयाचा आहे. तसेच दुसर्‍या डोजचे उद्दिष्ट देखील पूर्ण करावयाचे आहे. याकरिता गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे व दिवसाला सुमारे 200 विविध ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.
असाच एक कॅम्प रावणवाडी पीएचसी अंतर्गत सावराटोला या गावी आयोजित करण्यात आला होता. लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता. सर्वकाही सुरळीत सुरु होते. त्याच वेळी एका माथेफिरुने कोणतेही कारण नसताना लसीकरणाचे काम करणारे सितेशकुमार वर्मा, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी व सुनील कुमार चौधरी आरोग्य सेवक यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले व लसीकरणाचे काम ठप्प झाले.
ही बाब लक्षात येताच अपर जिल्हाधिकारी राजेश खवले,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, तहसीलदार अनिल खडतकर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. वेदप्रकाश चौरागडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मारहाण झालेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांती घेता यावी म्हणून पर्यायी कर्मचारी देण्याबाबत देखील चर्चा झाली. तथापि मारहाण झालेले कर्मचारी
सितेशकुमार वर्मा, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी व सुनील कुमार चौधरी आरोग्य सेवक
यांनी यावेळी अत्यंत बाणेदारपणे सांगितले की अशा वाईट घटनांचा आमच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही. आपण कृपया आम्हाला येथून बदलू नका. आजचे लसीकरण आम्हीच पूर्ण करणार आणि असे बोलून त्यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना समक्ष लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली व पुढील लसीकरण सुरळीत सुरू झाले. यावेळी रेखा ठाकरे, धनवंती बसेना, चित्रलेखा चिखलोंढे, कंचना दमाहे, चंद्रप्रभा दमाहे, वंदना काटेवार या इतर कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय धैर्याने आणि कर्तव्यनिष्ठेने लसीकरणाला सुरुवात केली. मारहाण झालेली असतानाही कोणत्याही प्रकारे आपले मनोधैर्य खचू न देता समर्पित भावनेने आणि कर्तव्यनिष्ठेने लसीकरणाचे काम पाडणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी गोंदिया श्रीमती नयना गुंडे यांनी या बाबीची विशेष दखल घेतलेली असून आरोग्य विभागाच्या या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा जिल्हा प्रशासनाद्वारे उचित सत्कार देखील केला जाणार आहे.