बिबट्याच्या बछड्याचा विहिरीत पडून मृत्यू

0
5
गोंदिया,दि.१४ : शासकीय आश्रमशाळेच्या आधार भिंतीच्या मागे कोयलारीचे पोलीस पाटील नरेश राऊत यांच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याने त्याचा विहिरीतच मृत्यू झाला. हा एक वर्षाचा बछडा असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे शेतमालकाचा मुलगा रबी धानाच्या पर्‍ह्यावर पाणी देण्यासाठी शेतातील विहिरीजवळ मोटारपंप सुरु करण्यासाठी गेला असता त्याला विहिरीतून आवाज येत होत्या. विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्याचा बछडा बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसले. त्याने घाबरून तेथून पळ काढला व बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी गावकर्‍यांना सांगितली. ही बातमी शेंडा, कोयलारी व मसरामटोल्यात वार्‍यासारखी पसरली. लोकांनी बिबट्याच्या बछड्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
दरम्यान शेंडा येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयाला माहिती मिळाल्यानंतर क्षेत्र सहायक राघोर्ते व वनक्षेत्राधिकारी राजकुमार राठोड घटनास्थळी पोहोचले. त्या बछड्याला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न झाला. परंतु, विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे बछडा बुडाशी गेला. मोटारपंपाने विहिरीतील पाणी पूर्ण काढल्यानंतर त्या बछड्याला बाहेर काढण्यात आले. तेव्हा पर्यंत तो मरण पावला होता.