नागपूर मेट्रो प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करावा- स्वाधीन क्षत्रिय

0
8

नागपूर दि.15: नागपूर मेट्रोच्या कामकाजाचा मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मंगळवारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटी देवून आढावा घेतला. सुमारे दोन तास मुख्य सचिवांनी नागपूर मेट्रो प्रकल्प कार्यालय, मिहान डेपोचे सुरू असलेले काम, वर्धा रस्त्यावरील एलिव्हेटेड व्हाया डक्टचे सुरू असलेले काम आदी ठिकाणी भेट दिली. त्यांनी मेट्रो प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

मेट्रो प्रकल्पाच्या कार्यालयात प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नागपूरचे विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष श्याम वर्धने आदी उपस्थित होते.

नागपूर मेट्रोचा आढावा घेताना श्री. क्षत्रिय म्हणाले, नागपूर शहराचा चेहरामोहरा आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मेट्रो सहाय्यभूत ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सामान्य नागरिकांना सुखद आणि जलद प्रवासाची अनुभूती मिळणार आहे. प्रकल्पासाठीच्या जमीन संपादनाचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाल्यामूळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशनच्या सर्व अधिकारी आणि तंत्रज्ञांनी पूर्ण क्षमतेने काम करावे असेही त्यांनी सूचित केले.