लोकनेत्यांनी केले सरकारी जमिनीवर अतिक्रमण

0
10

गडचिरोली : गडचिरोली-मूल मार्गावरील डोंगरे पेट्रोलपंपालगत एका सरकारी जमिनीवर लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार यांनी अतिक्रमण केले. तहसीलदार व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून शासनाची कोट्यवधीची जमीन हडपण्याचा हा डाव असल्याचा आरोप सुवर्णा कोचे व सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. स्थानिक पत्रकार भवनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सुवर्णा कोचे म्हणाल्या की, चंद्रपूर मार्गावरील सर्व्हे क्र. 829-1 आरजी 0.08 हेक्‍टर सरकारी जमिनीवर लोकनेते गडपल्लीवार यांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात आपण गडचिरोलीचे तहसीलदार जाधव यांच्याकडे तक्रार केली; मात्र अतिक्रमण हटविण्यात आले नाही. आजच्या बाजारभाव किमतीप्रमाणे या जागेची किमत एक कोटीच्या घरात आहे. प्रकरणात तहसीलदारासह काही महसूल विभागाचे कर्मचारी सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गडपल्लीवार यांनी अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनीच्या मागील भागात आपले घर आहे. अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी रस्ता राहिला नाही. जमिनीतून रस्त्यापुरती जागा द्यावी. त्या जमिनीचा मोबदला सरकारजमा करू, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती; मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही प्रशासनाने कारवाई केली नाही. उलट गडपल्लीवारांचे अतिक्रमण पक्के करण्याचा डाव महसूल विभागाचे कर्मचारी करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. अतिक्रमण हटवून रस्त्यासाठी जागा द्यावी, अशी मागणीही कोचे यांनी केली आहे.