गावाला केंद्रबिंदू मानून विकासाच्या योजना राबवा- राजकुमार बडोले

0
17

सालेकसा ,दि.२८ : सालेकसा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाला केंद्रबिंदू मानून विकासाच्या योजना राबविणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
आज (२८) सालेकसा पंचायत समिती येथे सालेकसा तालुका आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समिती सभापती हिरालाल थापनवाडे, उपसभापती राजकुमारी विश्वकर्मा, जि.प.सदस्य लता दोनोडे, राकेश शर्मा, पंचायत समिती सदस्य सर्वश्री दिलीप वाघमारे, प्रतिभा परिहार, प्रमिला दसरीया, जया डोये, भाजपा तालुका अध्यक्ष बाबा लिल्हारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सालेकसा हा दुर्गम, मागास व नक्षलग्रस्त तालुका आहे. या तालुक्यातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. योजनांच्या माहितीमुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे ठरेल. भविष्यात अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना वयाची दाखले देण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येईल. २ एकर व त्यापेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळाला पाहिजे असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांचा खऱ्या गरजूंना लाभ देण्यासाठी लवकरच तालुक्यात शिबीर आयोजित करावे. आम आदमी विमा योजनांसह केंद्र सरकारच्या अन्य योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. अपंग व्यक्तींना घरकूल योजनांचा लाभ देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेचे योग्य नियोजन करण्यात यावे असे निर्देश देऊन पालकमंत्री बडोले म्हणाले, या योजनेत मोठ्या प्रमाणात मजूरांना रोजगार मिळण्यास मदत होणार असून विविध विकास कामे करता येईल. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी करावी. निसर्ग संपन्न असलेला सालेकसा तालुका पर्यटनाच्या बाबतीत दुर्लक्षीत आहे. भविष्यात तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त रोजगार निर्मीती या क्षेत्रात होईल यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. तालुक्यातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प त्वरीत पूर्ण करुन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे. गावपातळीवरील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी व्यक्‍तीश: लक्ष घालावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिले.
आ. पुराम म्हणाले, सालेकसा तालुक्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे बचतगट तयार करुन त्यांना उद्योग व्यवसायाकडे वळवावे. तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी शिक्षकांनी परिश्रम घ्यावे.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, या तालुक्यातील नागरिकांना व लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे.
आढावा बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना, तहसिलदार प्रशांत सांगळे, गटविकास अधिकारी श्री.मोटघरे यांचेसह तालुकास्तरीय विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सरपंच यांचेसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.