जिल्ह्यात आतापर्यंत १६९९ शेतकऱ्यांचे १ कोटी ७७ लक्ष ४६ हजार रुपयांचे कर्ज माफ

0
7

गोंदिया,दि.२ : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले आहे अशा प्रस्तावाची छाननी करुन मंजूरी देण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. बैठकीला पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री.भवर, समितीचे सदस्य सचिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे निबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्रीकांत सुपे, तिरोडाचे सहायक निबंधक ए.बी.गोस्वामी उपस्थित होते. संबंधित बैठकीमध्ये तिरोडा तालुक्यातील २३३ प्रस्तावाची छाननी करुन २३३ प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. या प्रस्तावातील कर्जमाफीची रक्कम १६ लक्ष ९९ हजार ७६७ रुपये असून कर्जमाफी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १६९९ शेतकऱ्यांचे १ कोटी ७७ लक्ष ४६ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यात तिरोड्यातील ७४९, अर्जुनी मोरगाव येथील ५९४, सडक अर्जुनी/देवरीचे १०५, गोरेगावचे ७७ व आमगावच्या १७४ अशा एकूण १६९९ शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. ज्या सावकारांनी कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रस्ताव अद्याप सहायक निबंधक कार्यालयामध्ये सादर केले नाही त्यांनी आपले प्रस्ताव सादर करावे व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वी कर्ज घेतले असावे व ते कर्ज आजपर्यंत थकीत असावे. कर्जदार शेतकरी सातबारा धारक असावा. ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकार नियमन अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे. अशी माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर यांनी दिली.