थायलंडच्या भंते संघाने माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नागपूरच्या निवासस्थानी घेतली भेट

0
50

अर्जुनी-मोरगाव : थायलंड येथील भंते संघांने (Bhante Sangh of Thailand) श्रामणेर भंते अशोक उर्फ गगण मलीक यांच्या समवेत माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नागपूर येथील सुयोगनगर निवासी (ता.७) भेट घेतली. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सन २०१७ मध्ये महाराष्ट्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना थायलंड येथील वाटथांग टेंम्पल येथे श्रामणेर दीक्षा घेतली होती.

यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी माहिती दिली की, थायलंड येथील मोठा भिक्खू संघ बोधीपालो म्हणून मला ओळखत होता. महाराष्ट्रातील किंवा भारतातील एखाद्या मंत्री पदावरील व्यक्तीने श्रामणेर दीक्षा घेणे ही देशातील पहिलीच घटना असेल. थायलंड येथील बौद्ध धर्मीयांसाठी भारत ही वंदनीय भूमी आहे. या देशातूनच बौद्ध धम्म जगाच्या कानाकोपर्‍यात पसरला.

भारत जगात वंदन भूमी या धम्मामुळेच आहे. थायलंड तसा चिमुकला देश. पण सयामी लोकं खुपच प्रेमळ. त्यांच्या श्वासात बुद्धत्व आणि प्रेमाचा झरा सदा प्रवाहित. या देशाच्या राजधानीतील बँकांक शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वाटथांग टेंम्पलमध्ये मी श्रामणेर दीक्षा घेतली. त्यावेळी माझे अत्यंत जीवलग मित्र गगण मलीक यांनी मला सहायक म्हणून सहकार्य केले होते.

आज ते नागपूर शहरात श्रामणेर दीक्षा घेऊन आले. त्यांच्यासोबत वंदनीय भंते संघ आणि टेंम्पलमध्ये मला सहकार्य करणारे वंदनीय भंते होते. सगळ्यांना भेटून खुप आनंद झाला. धम्म प्रसारात ज्यांचे खूप योगदान आहे, ते “नटकीट” हे अगदी आवर्जून भंते अशोक उर्फ गगण मलीक यांच्यासोबत होते. त्यांना भारत म्हणजे दुसरी मायभूमी वाटते. ते सातत्याने भारतात येतात.

मागील दोन वर्षात जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे भेटी होत नव्हत्या. त्यामुळे या भेटीला खूपच महत्व होते. नटकी यांचेसोबत माझे अत्यंत घरगुती आणि जिव्हाळ्याचे संबंध. त्यांच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्य खुपच प्रेमळ. त्यांची आई म्हणजे खुपच प्रेमळ. प्रेमाचा निखळ निष्पाप झराच.

नागपूर शहरात सगळ्या भंते संघाचे आगमन झालं आणि त्यांचा सत्कार झाला हे बघून खुप बरे वाटले. देशात सर्वत्र ते धम्मध्वज घेऊन जातात, हे खुपच मंगलमय कार्य आहे.धम्म प्रचाराच्या या मोहिमेत भंते अशोक उर्फ गगण मलीक हे यशस्वी व्हावेत व परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गाने ते धम्मध्वज घेऊन असेच पुढे जावेत हीच शुभेच्छा.!