सुभाष बाग येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत

0
11

गोंदिया दि.१3: शहरातील एकमेव सुभाष बागेत काही गैरप्रकार घडू नये या दृष्टीने बागेत सीसीटिव्ही कॅमेरे लावून निगराणीत ठेवण्यात येणार आहे. या वर्षातील नगर परिषदेची पहिलीच आमसभा मंगळवारी (दि.१२) पार पडली. या आमसभेत त्यासंदर्भातील ठरावसर्वानुमते घेण्यात आला.
नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या अध्यक्षतेत व मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात ही आमसभा पार पडली. एकूण ३५ विषयांवर ही आमसभा बोलविली होती. यामध्ये महत्वाचे म्हणजे, शहरात आजघडीला सुभाष बाग ही एकमेव बाग असून येथे महिला व पुरूषांची चांगलीच गर्दी असते. या बागेत काही गैरप्रकारही घडत असल्याने या गैरप्रकारांवर आळा बसावा यासाठी बगिचा विभागाकडून बागेत सीसीटिव्ही लावण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याशिवाय वाढती महिला व पुरूषांची गर्दी बघता बागेत सहा शौचालय बांधकाम, विद्युत व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी एक लाईनमेनची नियुक्ती व पावसाळ्य़ात नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था याबाबत प्रस्ताव मांडण्यात आले होते. आजघडीला बागेचे महत्व लक्षात घेत या सर्व प्रस्तावांना सभेत मंजूरी देण्यात आली.
स्टेडियम परिसर किंवा सुभाष बागेत लालबहादूर शास्त्री व संत गाडगे महाराजांची प्रतिमा लावण्याबाबतच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली. याशिवाय नगरोत्थान योजना, दलितोत्तर योजना, रस्ता अनुदान योजना, दलीत वस्ती सुधार योजना तसेच बांधकाम विभागाकडून प्रस्तावित कमी दराच्या निविदांनाही सभेत मंजुरी देण्यात आली.