वीजेपासून होणाऱ्या अपघातास मानवी चुका कारणीभूत- प्राचार्य गजभिये

0
29

विद्युत सुरक्षा सप्ताह
गोंदिया,दि.१३ : वीजेची उपकरणे हाताळतांना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. वीजेपासून होणाऱ्या अपघातास मानवी चुका कारणीभूत असतात असे मत शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.ई.गजभिये यांनी व्यक्त केले.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षक कार्यालय गोंदियाच्या वतीने नुकतेच सुभाष गार्डन येथे विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य गजभिये बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) श्रीकांत सावळे, देवरीचे कार्यकारी अभियंता संजय वाकडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन गोंदियाचे अध्यक्ष हुकूमचंद अग्रवाल यांची उपस्थिती होती.
गजभिये पुढे म्हणाले, आपण ज्या परिसरात राहतो त्या भागातील नागरिकांना व शेजाऱ्यांना विजेचे अपघात टाळण्याबाबत जागृत करण्याचे काम प्रत्येकाने करावे. आपल्या घरची विद्युत उपकरणे सुव्यवस्थीत असल्याची खात्री करावी. अरथींग योग्यप्रकारे लावावे. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल.
वाकडे म्हणाले, वीज ही चुकीने हाताळणाऱ्याला क्षमा करीत नाही. ती भेदभाव सुद्धा करीत नाही. अत्यंत काळजीपूर्वक वीज उपकरणे हाताळल्यास विजेपासून होणारे अपघात टाळता येतात. मानांकन असलेली, आयएसआय ट्रेड मार्क असलेली आणि शासनमान्य असलेली उपकरणेच खरेदी करावी. त्यामुळे विजेपासून होणारे अपघात टाळता येतात.
सावळे म्हणाले, घरी वीज वापर करतांना वायरींग, अरथींग योग्य असल्याची खात्री करावी. कारखान्यात होणारे अपघात कामगारांच्या हलगर्जीपणामुळे होतात. त्यामुळे यास माणसाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. विजेची उपकरणे हाताळणाऱ्या व्यक्तींनी काळजीपूर्वक हाताळावी असे सांगितले.
खडसे यांनी मार्गदर्शनातून विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे काम शालेय विद्यार्थी प्रभावीपणे करु शकतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्युत सुरक्षा विषयक संदेश घरोघरी पोहोचविण्याचे काम होणार असल्याचे सांगितले अग्रवाल यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
विद्युत निरीक्षक श्री.खापर्डे यांनी प्रास्ताविकातून विजेमुळे सार्वजनिक ठिकाणी व घरी होणारे अपघात टाळण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करावी याबाबत माहिती दिली. तसेच विद्युत सुरक्षा सप्ताह दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. कार्यक्रमाला जिल्हा कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी श्री.रावत, श्री.लिल्हारे, श्री.सय्यद, राजु फुंडे, राजेश नानुरे, श्री.आगलावे, श्री.लांजेवार, श्री.पाऊलझगडे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी, नुतन महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय खापर्डे यांनी उपस्थितांना सुरक्षा प्रतिक्षा दिली. कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुहास धामणकर यांनी केले. विद्युत निरीक्षक दिनेशचंद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रॅली व विविध कार्यक्रम
विद्युत सुरक्षा सप्ताहाअंतर्गत गोंदिया येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला नुतन महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक अशोक इंगळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीमध्ये विद्युत सुरक्षाविषयीचे फलक व घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. रॅलीत नुतन महाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅलीने मार्गक्रमण केले.
जनसामान्यांमध्ये विजेच्या सुरक्षित वापराबाबत जागरुकता निर्माण व्हावी तसेच विजेच्या धक्क्यामुळे प्राणांकीत/अप्राणाकीत अपघातास आळा बसावा याकरीता संपूर्ण सप्ताह दरम्यान जिल्ह्यात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शनाकरीता शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया, शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा, नुतन विद्यालय गोंदिया, गुरुनानक हायस्कूल गोंदिया, शहीद जाम्या-तिम्या विद्यालय गोरेगाव, विद्यानिकेतन स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव या शाळा/महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे.