तीन दिवस चालणार वैनगंगा पर्यटन महोत्सव

0
19

भंडारा, जिल्ह्यातील कलावंताना हक्काचे व्यासपीठ मिळावे, लोप पावत असलेल्या विविध कलाप्रकाराना, खेळाना नवसंजीवनी मिळावी, तसेच जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून जिल्ह्यात वैनगंगा पर्यटन महोत्सवाचे आयोजन ६ ते ८ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या प्रमुख उपस्थिततीत हा सोहळा संपन्न होणार आहे. 
छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे तीन दिवस चालणार्‍या या महोत्ववात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कबड्डी, खो खो, डोंगा स्पर्धा, आट्या पाट्या, दांडपटटा या पारंपारिक क्रीडा प्रकारांचा यात समावेश असणार आहे. वैनगंगा नदीघाटावर जलपूजन करून महोत्सवास प्रारंभ होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात खा. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ. बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एम. सोनकुसरे तसेच सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
या महोत्सवात जिल्ह्यातील रुचकर खाद्य पदार्थांची ओळख व्हावी, म्हणून खाद्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच धान्य महोत्सव, मत्स्य संपदा प्रदर्शन, बांबू प्रदर्शन, कोसा प्रदर्शनाही भरविण्यात येणार आहे.
स्थानिक कलाकरांना प्रोत्साहन देण्यासोबतच लोप पावत असलेल्या कला प्रकारांना यात विशेष स्थान असणार आहे. ज्यात दंडार, डायका, गोंधळ, भजन इत्यादींचा समावेश आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे मनोरंजनासाठी नामवंत कलाकारांचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 
या महोत्सवाचे शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्यात आयोजन समिती, लोगो समिती, स्वागत समिती, क्रीडा समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, जाहिरात समिती, वित्तीय समिती, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा समिती आदींचा समावेश आहे.