वाळू माफियांकडून तलाठ्याला मारहाण,गुन्हा दाखल

0
12

विशेष प्रतिनिधी
तिरोडा, दि.२९ : पहाटे ३ वाजेच्या सुमारास वैनगंगा नदी घाटावर वाळू माफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या तलाठ्यावर वाळू माफियायांनी जीवघेणा हल्ला केला. तलाठ्याच्या घरी जाऊन पंचनामा, पैसे घेऊन माफिया पसार झाले. ही घटना गुरुवारी घडली. तिरोडा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. एक जण अद्यापही पसार आहे.
तिरोडा तालुक्यात महिनाभरापूर्वी तलाठी म्हणून तिघे जण रुजू झाले. त्यापैकी आनंद प्रभाकर भुते यांच्या घोगरा कार्यक्षेत्रातील चांदोरी (बिरोली) या वैनगंगा नदीच्या घाटावरून रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती तलाठी भुते यांना मिळाली. त्यांनी गुरुवारी सकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास घाटावर छापा टाकला. यावेळी त्यांनी चार ट्रॅक्टर पडले. त्यापैकी दोन ट्रॅक्टर पसार झाले. उर्वरित दोन ट्रॅक्टरमध्ये २ ब्रास वजनाची वाळू होती,त्यामुळे मालकांविरोधात त्यांनी दंडात्मक कारवाई केली. त्या ट्रॅक्टर मालकांकडून २५ हजार १०० रुपयांचा दंड आकारून पैसे स्वतःकडे ठेवून ते सहकारनगरस्थित स्वतःच्या घरी गेले. त्यानंतर ते बँकेत पैसे भरणार होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास आपण गराडा येथील तलाठी कार्यालयात तेथील तलाठी डी.एफ.नागदेवे यांच्यासोबत बसलो असता अनोळखी दूरध्वनीवरून कुठे आहेस अशी विचारणा करण्यात आली.तेव्हा आपण गराडा येथील तलाठी कार्यालयात असल्याचे सांगितले असता काही वेळाने त्याठिकाणी तिघेजण आले.त्यापैकी शिवकुमार पाटील व पवन पटले यांना आपण ओळखत होतो परंतु तिसरा व्यक्ती हा अनोळखी होता. त्याठिकाणी पटले व पाटील यांनी शिवीगाळ करून आमचे ट्रक्टर का पकडले तू कुठे राहतोस तिथे चाल असे म्हणून जोरजबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून साडेअकराच्या सुमारास तिरोडा येथील भाड्याच्या घरी घेऊन आले. आणि आपणास पुन्हा शिवीगाळ करीत मारहाण करीत घरी ठेवलेली दंडाची २५१०० रक्कम आणि त्यांच्याकडील घटना पंचनामा, चालान पावती आणि इतर कागदपत्रे घेऊन ते पसार झाल्याची लेखी तक्रार तिरोडा पोलिसात तलाठी भुते यांनी नोंदविली .त्यांच्या तक्रारीवर कलम ३५३,३३२,५०४,५०६ ,३९४,३६३ व ४२७ नुसार गुन्हा दाखल करून पवन पटले आणि शिवकुमार पाटील यांना पोलिसांनी अटक केली. इतर एकजण पसार आहे. वाळू माफिया तिरोडा तालुक्यात सक्रिय झाले असून त्यांच्या विरोधात महसूल विभागाने कंबर कसल्याने त्यांनी हा पवित्रा उचलला असावा, असे ते म्हणाले.