९८ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

0
8

नागपूर : वानाडोंगरी येथील राजीवनगरात असलेल्या शांतिनिकेतन विद्यालयातील ९८ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. यातील ९१ विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिकणारे आहेत. विशेष म्हणजे, ३00 विद्यार्थ्यांनी ही खिचडी खाल्ली होती.शांतिनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी दुपारी २.१३ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालेय पोषण आहारात खिचडी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास यातील काही विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला सुरुवात झाली. काहींच्या पोटातही दुखायला लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी खिचडीची तपासणी केली असता खिचडीत पाल असल्याचे आढळून आले. पाहता पाहता विद्यार्थ्यांची संख्या रात्री १0 वाजेपर्यंत ९१ वर पोहोचली. सुरुवातीला शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुलांना तपासून मेडिकल रुग्णालयात पाठविले. मेडिकलच्या वॉर्ड क्र. ६ मध्ये ३१ मुले तर अपघात विभागाच्या वॉर्डात ६0 मुलांना भरती करण्यात आले. सध्या सर्वच मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे यांनी मेडिकलमध्ये भरती असलेल्या मुलांना भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली.